आता सीआरपीएफच्या जवानाने व्यक्त केली व्यथा

0

नवी दिल्ली । बीएसएफचा जवान तेजबहाद्दूर यादव याने खराब जेवणाचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर आता सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानाने असाच व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत सीआरपीएफ जवानाने लष्करी जवान व सीआरपीएफ जवान यांच्यात केल्या जाणार्‍या भेदभावावर प्रश्‍न विचारला आहे. यामुळे लष्करच नव्हे तर निमलष्करातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याची बाब समोर आली आहे.

जीतसिंगचा व्हिडीओ ‘व्हायरल’
जीत सिंह हा मूळचा मुळचा मथुरा येथील रहिवासी असून सध्या तो माऊंट अबुमध्ये सेवा बजावत आहे. त्याने पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे की, आम्ही सीआरपीएफवाले देशातल्या सगळ्या ठिकाणी आमची सेवा देतो. निवडणुका, मंदिर, मस्जिद, चर्च याबरोबरच व्हीआयपी लोकांची सेक्युरिटी आदी ठिकाणी आम्ही तैनात असतो. पण लष्करी जवानांच्या तुलनेत आम्हाला सुविधा कमी आहेत. लष्करी जवानांना असलेल्या सुविधांमधील मेडिकल, कँटीन, पेन्शन आदी सुविधा आम्हाला नसल्याचे जीत यांनी या व्हिडीओत म्हटले आहे. त्याचबरोबर प्राध्यापकांना 50 हजार पगार व प्रत्येक सणाला सुट्टी असते पण आम्हाला सुट्टीही नसते तरीही आम्ही आमची सेवा करत असतो. त्यामुळे आम्हाला या सगळ्या सेवा मिळणे गरजेचे आहे. जीत सिंह याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी हा संदेश पाठवत असून त्यांनी याचा विचार करावा, असे म्हटले आहे.

‘त्या’ जवानावर दबाव
जम्मू-काश्मीरमधील सीमेवर तैनात असलेला बीएसएफचा जवान तेज बहादूर यादव यांनी व्हिडिओ पोस्ट करुन देशभर खळबळ उडवून दिल्यानंतर तक्रार मागे घेण्यासाठी माझ्या पतीवर दबाव आणला जात आहे, असे आरोप यादव यांची पत्नी शर्मिला यांनी आज केला आहे.
पत्रकारांशी बोलताना शर्मिला म्हणाल्या, माझ्या पतीने मांडलेली बाजू मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. याबाबत पतीसोबत माझे बोलणे झाले आहे. त्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही. सत्य परिस्थिती समोर मांडली आहे. जवानांना चांगले अन्न मिळावे एवढीच त्यांची मागणी आहे.