नवी दिल्ली: आता यापुढे स्वस्त धान्य दुकानात धान्यासोबतच स्वस्त दरात चिकन, मटण, अंडी देखील उपलब्ध करण्याचा सरकारचा विचार आहे. अन्नसुरक्षा योजनेचा विस्तार करून आता पोषण सुरक्षेला सरकार प्राधान्य देणार आहे. गरिबांना पोषण आहार सहज आणि कमी किंमतीत उपलब्ध व्हावा, हा या मागचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या रेशन दुकानांवर गरिबांना गहू, तांदूळ, कडधान्ये, साखर, तेल या वस्तू सवलतीच्या दरात मिळतात. अन्नधान्य अनुदानापोटी सरकारला मोठी तरतुद करावी लागते. या रेशन दुकानांवर आता पोषणयुक्त पदार्थ देण्याचा सरकारचा विचार आहे. सुरवातीच्या टप्प्यात किमान एक ते दोन प्रोटीनयुक्त पदार्थ रेशन दुकानावर उपलब्ध केले जातील, असे विश्वसनीय सूत्रांनी म्हटलं आहे. प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थांमध्ये मटण,अंडी, मच्छी आणि चिकन या खाद्यवस्तू रेशनवर ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
पोषण सुरक्षेचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी नीती आयोगाकडून ही योजना तयार केली जात आहे. नीती आयोगाचे रेशन दुकानांवरील वस्तूंची यादी आणखी व्यापक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याची सुरुवात किमान एक किंवा दोन प्रोटीनयुक्त खाद्यवस्तूंनी होईल. अन्नधान्यांबाबत बहुतांश भारतीय स्वयंपूर्ण आहेत, मात्र तरीही देशात कुपोषण आणि अॅनिमियासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या समस्या दूर करण्यासाठी नीती आयोगाकडून विचार सुरु आहे.