मुंबई – दहावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे नववीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच नववीच्या नापास विद्यार्थ्यांच्या पुर्नपरीक्षा घेण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने गुरुवारी जारी केले.
हा निर्णय जून २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून लागू राहणार आहे. शैक्षणिक वर्ष वाया जाऊन शिक्षणात खंड पडू नये यासाठी राज्य सरकारने सुरूवातीला १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी लगेच पुर्नपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला. त्याच धर्तीवर आता नववीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही पुर्नपरीक्षा त्या त्या शाळांकडूनच घेण्यात येणार आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी अर्थात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षा घेण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना दिले आहेत. नववी किंवा १० वीमध्ये गणित, इंग्रजी आणि विज्ञान या विषयात विद्यार्थ्यांना अडचणी येतात. त्यामुळे या विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असते. या विषयात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात याकरीता आणि चाचणी परीक्षेत विद्यार्थ्यांचा या विषयातील कलही लक्षात घेऊन अशा विद्यार्थ्यांसाठी खास वर्गाचे आयोजन करण्याचे आदेशही सर्व शाळांना देण्यात आले आहेत.
पुर्नपरीक्षेची संधी देऊनही पुन्हा विद्यार्थी नापास झाल्यास त्या विद्यार्थ्याला पुन्हा एकदा संधी देत त्याची पुर्नपरीक्षा घेऊन उत्तीर्ण होण्याची संधी द्यावी, असा स्पष्ट आदेशही शालेय विभागाने काढला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नववीत नापास होऊन शिक्षणापासून दूर जाण्याच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता असून शाळा सोडण्याचे प्रमाणही कमी होणार आहे, असे बोलले जाते.