पुणे । पुणे दक्षिण विभागाचे अपर आयुक्त शशिकांत शिंदे यांच्या हस्ते हिस्ट्रीशिटर्स अर्थात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची गुगल लिंक पोलीस 19 ठाण्यांना प्रदान करण्यात आली. यामध्ये पुणे शहर व उत्तर प्रादेशिक पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.
ही लिंक गुरुवारी (दि.3) उत्तर प्रादेशिक विभाग कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आली. येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक कदम व तांत्रिक तज्ज्ञ रियाज नदाफ यांनी ही लिक तयार केली आहे.महापालिकांच्या निवडणुकीच्या काळात हिस्ट्रीशिटर्सची गुगल मॅपवर लिंक तयार करण्याचे काम कदम व नदाफ यांनी सुरू केले होते. त्यांच्या या कामाची नोंद घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन यांनी त्यांच्या प्रयोगाची माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांना दिली. प्रयोगाची माहिती घेत साकोरे यांनी या दोघांना अशीच लिंक परिमंडळ 4 व उत्तर प्रादेशिक विभागाकरिता बनविण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार 19 पोलीस ठाण्यांच्या 362 हिस्ट्रीशिटर्सच्या लिंक तयार करून दिल्या आहेत. त्यांच्या या कामासाठी दीपेन कदम, गुलाब शिवले, शरद बांगर, गणेश पाटोळे तसेच 19 पोलीस ठाण्याच्या कर्मच्यार्यांनी त्यांना मदत केली आहे.
लिंकचा वापर
या गुगल लिंकचा वापर करून पोलीस दलातील कोणताही अधिकारी व कर्मचारी धडक गुन्हेगारांच्या घरी पोहचू शकतो. त्यामुळे गुन्हेगारांना शोधणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक अधिक वाढणार आहे, अशी अपेक्षाही अपर पोलीस आयुक्त शिंदे यांनी व्यक्त केली. सध्या ही लिंक केवळ परिमंडळ चारसाठी बनवलेली असली तरी संपूर्ण पुणे शहराच्या पोलीस ठाण्यांसाठी अशीच गुगल लिंक तयार करण्याचे काम सुरू आहे. या सर्व लिंकचे काम पूर्ण झाल्यानंतर पोलिसांसाठी एक मोबाइल अॅप्लिकेशनही लवकरच बनविण्यात येणार आहे.