नंदुरबार: प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पुकारलेल्या आत्मक्लेश आंदोलनाला जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले. जिल्ह्यातून सुमारे सहाशे प्राध्यापकांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.भरत देसले यांनी दिली.
यावेळी जिल्हा संघटनेच्यावतीने संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा राजेंद्र शिंदे, सचिव प्रा. संजय पाटील, प्रा.अनिल पाटील, प्रा.कमर रजा शेख व पदाधिकारी यांनी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांना आत्मक्लेश आंदोलनाबाबत माहिती देत मागण्यांचे निवेदन सादर केले.
राज्य शासनाने कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केले आहे. काही समस्यांच्या बाबतीत निर्णय घेऊन अंमलबजावणी केलेली नाही. गेल्या वीस वर्षापासून विनाअनुदान तत्त्वावर काम करणाऱ्या कनिष्ठ शिक्षकांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय विधिमंडळात घेण्यासह तशी तरतूद अर्थसंकल्पात करूनही वीस टक्के अनुदानाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. राज्यात जवळपास दहा ते बारा हजार कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक उपाशीपोटी विनावेतन काम करीत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.
शैक्षणिक संघटना, शिक्षक आघाडीचा पाठिंबा
राज्यातील लोकप्रतिनिधींनी तात्काळ महासंघाच्या आंदोलनाची दखल घेतली. शैक्षणिक संघटना, महाराष्ट्र शिक्षक आघाडीनेही आंदोलनाला पाठिंबा दिला होता. नाशिक पदवीधर मतदारसंघ आमदार डॉ. सुधीर तांबे तसेच मराठवाडाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या पुढे महासंघाचे प्रश्न मांडले. लोकप्रतिनिधी व शिक्षणमंत्री यांच्यातील चर्चेनुसार आठवडाभरात शासनाकडून काही आदेश निर्गमित होण्याचे संकेत आहे. उर्वरित मागण्या मान्य करण्याच्या दृष्टीने सर्वांनी पुढील लढ्यासाठी तयार राहण्याचे आवाहन महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.