आत्मक्लेश यात्रेमुळे मुंबईकरांना क्लेश

0

मुंबई । स्वाभिमान शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी काढलेली आत्मक्लेश यात्रा सोमवारी मुंबईत दाखल झाली. या यात्रेमुळे पनवेल सायन मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने मानखुर्दपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे मुंबईकर हैराण झाले होते. ही यात्रा मंगळवारी राजभवनावर धडकणार असून, शेतकर्‍यांच्या समस्यांविषयी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे.

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा मुद्दा अनेक दिवसांपासून गाजत आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर संवाद यात्रा काढली, त्या पाठोपाठ शिवसेनेने शिवसंवाद अभियान राबवले तर सरकारच्यावतीने शिवार संवाद मोहीम सुरू असतानाच स्वाभिमान शेतकरी संघटनेने शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर रान उठवले आहे. शेतकर्‍यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रा काढली आहे. पुण्यातून 22 मे रोजी आत्मक्लेश यात्रेला सुरुवात झाली. पुण्यातील फुले वाड्यात क्रांतीसूर्य जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून ही आत्मक्लेश यात्रा मुंबईच्या दिशेने रवाना झाली. पनवेल, नवी मुंबई, मानखुर्द या मार्गे या यात्रेचे मुंबईत आगमन झाले. सोमवारी चेंबूरच्या शिवाजी पुतळ्याला अभिवादन करून ही यात्रा लालबागच्या दिशेने रवाना झाली आहे. शेतकर्‍यांचा सात-बारा उतारा कोरा करा, कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा इत्यादी मागण्या खासदार शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रेच्या माध्यमातून सरकारकडे केल्या आहेत. या यात्रेमुळे पनवेलहून मुंबईत येणार्‍या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाशीच्या खाडी पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या यात्रेमुळे नागरिकांना व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. लालबाग, परळ मार्गे ही यात्रा मंगळवारी राजभवनावर धडकेल. या ठिकाणी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

राजू शेट्टीच्या मुलाला भोवळ
खासदार राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेच्या मुंबई प्रवासाला सुरुवात झाली त्या दरम्यान राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी याला भोवळ आल्याचा प्रकार घडला. गेल्या आठ दिवसांपासून सौरभ वडिलांबरोबर पायी चालत आहे. मांटुग्यातील फाईव्ह गार्डन परिसरात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यात्रा फाईव्ह गार्डनच्या परिसरात असतानाच सौरभला अचानक भोवळ आली. यावेळी डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार केले. सौरभला सलाईन लावल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. उष्णता आणि अशक्तपणामुळे सौरभला भोवळ आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान या घटनेनंतरही आत्मक्लेश यात्रा सुरूच राहणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी राजू शेट्टी यांनाही यात्रेदरम्यान त्रास झाला होता. डॉक्टरांनी त्यांना यात्रा थांबवण्याचा सल्ला दिला होता. मात्र आत्मक्लेश यात्रा थांबवणार नाही, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले होते.