सहा ठार, इसिसने स्वीकारली जबाबदारी
काबूल : अफगानिस्तानची राजधानी असलेले काबूल शहर सोमवारी पुन्हा एकदा भीषण आत्मघातकी हल्ल्याने हादरले. विशेष म्हणजे, अफगानिस्तानच्या गुप्तचर विभागाच्या मुख्य कार्यालयाला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हल्ल्यात सहा नागरिकांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
काबूलमध्ये दहशतवादी हल्ले वाढले
सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अफगाणिस्तानच्या नॅशनल डायरेक्टरेट ऑफ सिक्युरिटीच्या कार्यालयाबाहेर एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला. या व्यक्तीच्या अंगावर बॉम्बसदृश वस्तू पाहून त्याला पकडण्याचा सुरक्षा रक्षकांनी प्रयत्न केला. यावेळी त्यांनी आपल्या स्वतःच्या अंगावर असलेल्या बॉम्बचा स्फोट घडवून आणला. यामध्ये कार्यालयाबाहेर असलेल्या सहा नागरिकांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीररीत्या जखमी झाले. या घटनेनंतर काबूल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, कार्यालयाबाहेरील सर्व परिसर प्रवेशासाठी बंद केला. तसेच या स्फोटामध्ये जखमी झालेल्या नागरिकांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले. यानंतर थोड्याच वेळात इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत, हा हल्ला आपणच घडवून आणल्याची कबुली दिली. गेल्या वर्षभरामध्ये काबूलमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले झाले आहेत. अमेरिकेने आपले नवीन अफगाण धोरण जाहीर केल्यानंतर तालिबान, अल कायदा आणि इसिसने सातत्याने काबुलला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या अगोदर सार्वजनिक ठिकाणी, सरकारी ठिकाणी, दूतावास आणि काबूल विमानतळालादेखील दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेले होते.