आत्मपरीक्षण करणे गरजेचे : अनिल जठार

0

पुणे । यशस्वी माणूस होण्यासाठी आपली ताकद आणि कमकुवतता जाणून घेणे गरजेचे असते. त्यासाठी स्वत:शी संवाद साधता आला पाहिजे. आपण करीत असलेले कार्य एकनिष्ठेच्या धोरणानुसार आहे की नाही याबाबत प्रत्येक व्यक्तीने आत्मपरीक्षणदेखील करणे गरजेचे आहे, असे मत अनिल जठार यांनी व्यक्त केले.

सॅट अ‍ॅट बीव्ही चर्चासत्राचे भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी बीपीएल ग्रुपचे एक्स रे सल्लागार (बंगळूर) अनिल जठार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा थेट उद्योजकांशी संवाद साधण्याच्या प्रमुख हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंद भालेराव उपस्थित होते.

उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील दरी होणार कमी
उपक्रमाबाबत माहिती देताना डॉ.भालेराव म्हणाले, या उपक्रमाचे चौथे वर्ष आहे. विद्यार्थ्यांना नवोदित अभियंते म्हणून काम करताना उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी कमी करण्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे. यात विद्यार्थ्यांकडून आणि उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यशस्वी उद्योजकांची कौशल्ये, त्यांचा यशाचा प्रवास याबद्दल प्रत्यक्ष विचार ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे. भारतीय व पाश्‍चात्य व्यवस्थापकीय धोरणे विद्यार्थ्यांना शिकायला मिळतात.

कमकुवतपणा सुधारण्यास मदत
जठार म्हणाले, व्यक्तिमत्त्वातील दोष ओळखण्यासाठी आणि सकारात्मकता येण्यासाठी स्वतःशी बोलणे उत्तम असते. याचा अर्थ स्वतःची प्रशंसा करणे नसून, यामुळे आत्मपरीक्षण केले जाऊन कमकुवतपणा सुधारला जाण्यास मदत होते.