आत्महत्यांचे सत्र आता तरी थांबवा!

0

मराठवाड्यातील आठ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली, अशी बातमी आजच झळकली आहे. कर्जमाफी केल्यापासून जवळपास 3 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारी आकडेवारीच हे सांगते. राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत आतापर्यंत 31 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम वितरित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दाखल झालेल्या अर्जातील 47.73 लाख खात्यांवर कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ मंजूर केला असून, त्यासाठी सुमारे 23 हजार 102 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी 5 फेब्रुवारीअखेर 31.32 लाख कर्ज खात्यांवर लाभापोटी 12 हजार 362 कोटींची रक्कम वितरित करण्यात आली आहे. मंजूर करण्यात आलेल्या एकूण 47.73 लाख कर्ज खात्यांपैकी बँकांकडून काही खात्यांवरील माहिती अद्ययावत करून पुन:श्‍च पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे, तरीही आत्महत्या सुरूच आहेत.

औरंगाबाद, जालना जिल्ह्यात प्रत्येकी तीन, तर बीड जिल्ह्यातील दोन शेतकर्‍यांचा समावेश आहे. कर्जबाजारीपणाला व नापिकीला कंटाळून पाच शेतकर्‍यांनी जीवन संपवले, तर तीन शेतकर्‍यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. गंगापूर तालुक्यातील पाडळसा येथील शेतकरी राम सोपान सोनवणे (33) यांनी शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेतला. राम यांनी शेतीसाठी उसने पैसे घेतल्याचे नातेवाइकांनी सांगितले. दुसर्‍या घटनेत पैठण तालुक्यातील आडूळ खुर्दचे सूर्यभान हरिभाऊ भावले (40) यांनी सोमवारी मध्यरात्री विष घेतले. बोंडअळीमुळे त्यांचे कपाशीचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. कर्जमाफीच्या पहिल्या यादीत नाव न आल्याने कन्नड तालुक्यातील आडगाव (जुहूर) येथील अनिल केरुजी सोनवणे (34) यांनी सोमवारी विष घेतले. त्यांनी एक लाखाचे कर्ज काढले होते. केज तालुक्यातील होळ येथील आबासाहेब गोविंदराव शिंदे (44) यांनी कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली. चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून त्यांनी 95 हजारांचे कर्ज घेतले होते. दुसर्‍या घटनेत परळी तालुक्यातील सिरसाळा गावात मंगळवारी सकाळी एकनाथ गंगाराम चव्हाण (45) या शेतकर्‍याने विष घेत जीवनयात्रा संपवली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. जालना जिल्ह्यात तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. एकट्या जाफराबाद तालुक्यात दोघांनी जीवन संपवले. यात जाफराबाद पोलीस ठाण्यात विष घेतलेल्या साहेबराव एकनाथ मिचके (65, कुंभारी) या शेतकर्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी रात्री 8.30 च्या सुमारास ठाणे अंमलदार व अन्य 3 ते 4 पोलिस कर्मचारी ठाण्यात बसलेले असताना मिचके तेथे आले. एका पोलिसाचे नाव घेत त्यांनी विषारी औषध प्राशन केले. दुसर्‍या घटनेत बुटखेडा तांड्यावरील (ता. जाफराबाद) आसाराम नंदू पवार (50) यांनी विहिरीत उडी घेतली.

डोलखेडा येथे ऊसतोडीसाठी जातो म्हणून ते 4 फेब्रुवारीला घरातून ते बाहेर पडले होते. मंगळवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास मौजे वाढोणा शिवारातील पाणीपुरवठ्याच्या सरकारी विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. दोघांच्याही आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. तिसर्‍या घटनेत जालना तालुक्यातील बाबर पोखरी येथील दिलीप दत्तू पवार (29) या तरुण शेतकर्‍याने राहत्या घरातच गळफास घेतला. डोक्यावर असलेले कर्ज आणि नापिकीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. आत्महत्या हा काही त्यावरचा उपाय नव्हे. खासगी सावकारी रोखा आणि शेतकर्‍याच्या मालाला हमी भाव द्या, तरच फरक पडेल. मनाला खूप वेदना होतात, अशा बातम्या वाचून.

– अर्जुन जगधने
नंदादीप विद्यालय गोरेगाव, मुंबई.
9869474782