इंदापूर । महिन्याभरापुर्वी एका युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी येथे घडली होती. परंतु तपासाअंती ही हत्या असल्याचे उघड झाले असून सख्ख्या चुलत्यानेच पुतण्याचा काटा काढल्याचे समोर आले. युवकाच्या आईनेच मुलाचा खून झाल्याची कबुली पोलिसांना दिली. परंतु चुलत्यांच्या दहशतीमुळे गुन्ह्याची वाच्यता केली नव्हती, असे तिने स्पष्ट केले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. प्रशांत झगडे (वय 22) असे आत्महत्या करणार्या तरुणाचे नाव आहे.
चुलत्याची दहशत
चुलता व चुलत भावाच्या दहशतीमुळे मी व माझे कुटुंब शांत होतो, अशी कबुली त्यांनी दिली. रविवारी (10 डिसेंबर) मनातील भिती दूर सारत प्रशांतच्या आईने इंदापूर पोलिस ठाण्यात येऊन हरिदास व चुलत भाऊ सुभाष हरिदास झगडे याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींची चौकशी करून त्यांना अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक महेंद्रसिंह निंबाळकर करीत आहेत.
असे आहे प्रकरण
प्रशांतचे चुलते हरीदास झगडे यांच्या सुनेबरोबर अनैतिक संबध होते. याबाबतची माहिती हरीदास यांना समजली होती. बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी प्रशांतच्या आईला सदर प्रकरणाची माहिती देऊन त्याला समजविण्याचा सल्ला देत मारून टाकण्याची धमकी दिली होती. प्रशांतच्या आईने मुलाला व हरिदासच्या सुनेला समजावून सांगितले होते. परंतु हरीदास प्रशांत दिसला की, त्याला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी देत होता. 13 नोव्हेंबरला पहाटे प्रशांत घराच्या पत्र्याच्या अँगलला लटकलेला दिसून आला. परंतु प्रशांत आत्महत्या करणार नाही, असा विश्वास त्याच्या आईला होता. त्याला मारून गळ्यात इस्त्रीची वायर बांधून पत्र्याच्या अँगलला त्याला लटकवले होते, अशी माहिती प्रशांतच्या आईने पोलिसांना दिली.