नवी मुंबई । जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त नवी मुंबई रायगड मानसोपचार संघटना आणि मानसोपचार विभाग यांच्यातर्फे रविवारी सकाळी डॉ.डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयात चैलेजिंग दि सुसाईड व्हेल हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी अनेक डॉक्टरांनी अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.नवी मुंबई रायगड मानसोपचार संघटनेचे भावी अध्यक्ष डॉ.राकेश घिलदियाल यांनी कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच आपली भूमिका स्पष्ट करत आजच्या जगात मानसिक आरोग्याचे महत्व यावर भर देत आत्महत्या हा मानसिक आजार असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रसिध्द मानसोपचार डॉ. हरीश शेट्टी यांनी विद्यार्थ्यांशी संवांद साधला.
ते आत्महत्या व त्यांना पायबंद कसा घालता येईल याविषयी सांगत होते. तर नैराश्य या मानसिक आजाराची लक्षणे व विवेकी पालकत्व या विषयांवर अत्यंत सोप्या भाषेत उपस्थितांना सांगत होते. महेश पोद्दार यांनी आपल्या मुलीच्या आत्महत्येनंतर त्या मागील कारणे शोधण्यापासून ते आज इतरांना त्यापासून प्रवृत्त करण्यामागील स्वतचा प्रवास उलगडून दाखवला.त्याचवेळी अनेकांनी या विषयांवर मार्गदर्शन केले.सध्या परिस्थितीत तथाकथित ब्ल्यू व्हेल चैलेंज मुळे घडणार्या आत्महत्या हे वास्तव नसून त्या बद्दल अजूनही कुठलाच न्यायवैद्यक पुरावा हाती लागलेला नाही असे ठळकपणे यावेळी मांडण्यात आले.या मार्गदर्शन शिबिराला उदंड प्रतिसाद लाभल्याने कार्यक्रम यशस्वी झाल्याचे यावेळी नवी मुंबई रायगड मानसोपचार संघटनेचे भावी अध्यक्ष डॉ.राकेश घिलदियाल यांनी सांगितले.