जातीपंचायतीने मुलीच्या आई, वडीलांकडून घेतली दंडांची रक्कम ; जातगंगा करुन तरुणीवर रुढींपरंपरेनुसारच अंत्यसंस्कार
जळगाव- शहरातील कंजरभाट या जातीत न घेतल्याने मानसी बागडे या तरुणीने जातपंचायतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येनंतर म्हणजेच्या मानसीच्या मृत्यूनंतरही पाझर न फुटलेल्या जातपंचायतीने तिच्या आई वडीलांकडून 20 हजार रुपयांचा दंड वसूल करुन तरुणीचा जातीत समावेश केला. तिच्यावर शुध्दीकरण करुन कंजरभाट समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केला. आधीच जातपंचायतीने मानसीचा दंड स्विकारुन जातीत स्विकार केला असता, तर कदाचित मानसीने आत्महत्या केली नसती, असाही सूर निघत आहे.
12 तास तरुणीचा मृतदेह घरातच
मानसीच्या आत्महत्या केल्यानंतर तिचा मृतदेह 12 तास घरातच ठेवत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न संबंधितांनी केला. तसेच तिच्या आईने पोलिसात तक्रार करू नये म्हणून दबाव देखील टाकण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, औद्योगिक वसाहत पोलिसांना तरुणीच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यावर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. परंतु, तरीही युवतीचे कुटुंबीय तसेच पोलीस याप्रकरणी स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. या घटनेला मानसीचे आजोबा यांच्यासह जातपंचायत जबाबदार असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी समाजबांधवांकडून करण्यात येत आहे.
सुनेसह नातीचा आजोबांकडून जातीत नसल्याने छळ
समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. यात मानसीच्या आई वडीलांच्या विवाहानंतर तिचे आजोबा यांनी मानसीच्या आईचा जातीत स्विकार केला नाही. यानंतर मानसीचा जन्म झाल्यानंतर तिलाही कंजरभाट जात देण्यास आजोबांनी नकार दिला. यानंतर कंजरभाट समाजाच्या मुलाशी विवाह करेन पण जातीत घ्या, अशी मागणी मानसी आजोबा तसेच जात पंचायतीचे सदसय सावन गागडे, दिपक माछरे, बिरुज नेतले, मंगल गुमाने व संतोष गारुगे यांच्याकडे केली. मात्र जातपंचायतीसह आजोबांनी मानसी तसेच तिच्या आईला जातीत घेण्यास नकार दिला. आजोबांनी बाहेरच्या बाईला माझी जात देणार नाही, असे सांगून अनेकदा सून असलेल्या मानसीच्या आईचा तसेच नात मानसीचा छळ केला. तसेच जातपंचायतीने आणखी एका मुलीचा बळी घेतला असल्याचे त्यात नमूद आहे. तसेच याप्रकरणी कारवाईची मागणी देखील होत आहे.
मृत्यूनंतर तरुणीला जात देवून अंत्यसंस्कार
मानसीच्या मृत्यूनंतरही तिचा कंजरभाट जातीच्या रिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यासाठी जातपंचायतीने मानसीचे आई व वडील यांच्याकडून रोख 20 हजार रुपयांचा दंड घेतला. यानंतर जातगंगा देवून तिचे शुध्दीकरण करुन तिला जातीत घेतले. यानंतर समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे तिच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी देखील तपास सुरू केला आहे. परंतु, नेमकी माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.
सामाजिक बहिष्कार कायद्यानुसार कारवाई करावी
येथील जाखनीनगर भागातील रहिवासी मानसी उर्फ मुस्कान आनंद बागडे या तरुणीच्या आत्महत्येस कारणीभूत जमातीच्या जात पंचांची सखोल चौकशी करून सर्व जात पंचांवर प्रचलित आपण सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा 2016 नुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या जळगाव शाखेतर्फे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट दिली. परिस्थिती व घटनेचे प्राथमिक स्वरूप जाणून घेतले. यावेळी विश्वजीत चौधरी, अॅड. भरत गुजर, अशफाक पिंजारी, जितेंद्र धनगर, अॅड.डी.एस.भालेराव, आर.एस.चौधरी उपस्थित होते.