आत्महत्येनंतर मृतदेहाची पोलिसांकडून हद्दीच्या वादात तब्बल चार तास अवहेलना

0

सर्व पोलीस ठाण्यांमध्ये स्टेशनमास्तरांनी पाठविले मेमो ; कुणीही दाद घेईना ; नागरिकांच्या फोनवरही प्रतिसाद नाही ; उशीराने मेमो मिळाल्याचे सांगत अखेर लोहमार्ग पोलीस पोहचले

जळगावः शहरातील बजरंग बोगद्यानजीक डाऊन रेल्वे लाईनवर एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार सकाळी 10.30 वाजता समोर आला. रेल्वेच्या मालगाडी चालकाला रुळावर कुणीतरी झोपलेले दिसल्याने त्याने आपतकालीन ब्रेक दाबून गाडी थांबविली. मात्र रुळावर डोके असल्याने गाडी थांबून तिचा नाकाला जोरदार फटका बसल्याने व्यक्तीचा मृत्यू झाला. ट्रॅकमॅनने मृतदेह रेल्वेरूळावरुन बाजूला केला. स्टेशन प्रबंधकांनी सर्व पोलीस ठाण्यांना मृतदेहाबाबत मेमो पाठविल्यावर कुणीही दाद दिली नाही. यानंतर सुज्ञ नागरिकांनी फोन केल्यानंतर तब्बल चार तासानंतर लोहमार्ग पोलिसांना जाग आली. व त्यांनी घटनास्थळ गाठले. तोपर्यंत पावसात एकाच जागी पडलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह भिजून त्याची अवहेलनाही झालीच होती. घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. विशेष म्हणजे पडलेल्या मृतदेहाला आपल्या स्मार्ट फोनमध्ये कैद करुन मरणाची घटनाही इन्जॉय करणारी तरुणाई तसेच नागरिकांची मेलेली माणसुकीही यावेळी पहावयाला मिळाली.

पहिली’च्या चिमुकल्याने बघितला आत्महत्येचा प्रकार
शहरातील बजरंग बोगद्यापासून काही अंतरावर रेल्वे रुळालगत झोपलेला इसम सकाळी 10 वाजेच्या सुमारास उडला. त्याच्या हातात पाण्याची बाटली होती. अंदाजे 45 ते 50 वयोगटातील हा व्यक्ती पाणी पिल्यानंतर थेट डाऊन रेल्वे लाईन खंबा क्रमांक 417/31 ते 418/00 दरम्यान रेल्वे रुळावर आडवा झोपला. त्याने डोके रुळावर ठेवले होते. हा सर्व प्रकार जवळच असलेल्या एका घरातील पहिली इयत्तेत शिकत असलेला निखिल नावाचा मुलगा बघत होता. त्याने त्याच्या आईला व वडीलांना प्रकार सांगितला. वडील पोहचतील तोपर्यंत मालगाडी येवून तिचा धक्क्याने व्यक्तीचा मृत्यू झालेला होता.

मृतदेह बाजूला केल्यावर मालगाडी मार्गस्थ
डाऊन रेल्वे लाईनवरुन सकाळी 10 वाजेच्या सुमारास नागपूरकडे मालगाडी जात होती. चालकाला रेल्वे रुळावर व्यक्ती झोपलेला दिसला. त्याने त्याच्या इमजन्सी ब्रेकही दाबले. अन् गाडी रुळावर झोपलेल्या व्यक्तीपर्यंत पोहचली व त्याच्या नाकाला गाडीचा जोरदार मारही बसला. अखेर चालकाचे प्रयत्न निष्फळ ठरले. गाडी थांबविली. त्याने प्रकार स्टेशन प्रबंधकांना कळविला. याचदरम्यान रेल्वेच्या अपलाईनवर उ÷ड्डाणपूलाखाली काही रेल्वेचे ट्रॅकमन विकास रमेश साबळे हे पॅकिंगचे काम करत होते. त्यांना त्याच्या वरिष्ठांचा फोन आला. त्यानुसार त्यांनी घटनास्थळ गाठून रुळावर पडलेला व्यक्तीचा मृतदेह बाजूला केला. यानंतर मालगाडी मार्गस्थ झाली.

ट्रॅकमॅन मृतदेहावर चार तास लक्ष ठेवून
पोलीस येईपर्यंत ट्रॅकमॅन किरण साबळे कुत्र्यांपासून मृतदेहाचा बचाव करीत होता. मात्र चार तास उलटूनही कुणीही आले. दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास लोहमार्ग पोलीस पोहचले. विशेष म्हणजे यावेळी नागरिक तसेच पोलीस उपविभागीय कार्यालयातील कर्मचार्‍याने घटनास्थळ गाठले. संबंधित पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांना फोन केला. मात्र कुणीही दाद घेत नसल्याने अखरे कर्मचार्‍याने पोलीस उपअधीक्षकांना प्रकार कळविला. पोलीस अधीक्षकांना रामानंदनगर पोलीस ठाण्यात फोन करुन माहिती घेण्याचे आदेश दिले. 3.30 वाजेपर्यंत याठिकाणी लोहमार्ग पोलीस सोडून कुठल्याच पोलीस विभागाचा अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी आलेला नव्हता.

घटनास्थळावर आढळले कपड्याची बॅग, चप्पल
डाऊन रेल्वेलाईनलगत 50 मीटरच्या अंतरावर मोकळ्या जागेच एक साडी, कपडे असलेली बॅग, चप्पल तसेच वेफरचे पाकिट, कचोरी आढळून आली आहे. रहिवाशांनी सांगितल्यान नुसार संबंधित मयत इसम हा रात्री याठिकाणी झोपला असावा, सकाळी आत्महत्या करण्यासाठी तो रेल्वे रुळाकडे गेल्याचे सांगितले. सहाय्यक फौजदार बाबुराव खरात, हेड कॉन्स्टेबल योगेश चौधरी, योगेश अडकणे या लोहमार्ग पोलिस कर्मचार्‍यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. अद्यापर्यंत व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही. सावळा रंग, गोल चेहरा, अंगात बदामी रंगाचा सफारी असे वर्णन तसेच त्याच्यावर काळ्या रंगाची बॅग व ब्राऊन रंगाची सॅन्डल असे साहित्य असून ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.

मृतदेहाचा स्टेशन मास्टरच्या डोक्याला ताप
रेल्वे चालकाकडून व्यक्तीच्या मृतदेहाची माहिती मिळाल्यावर जळगाव स्टेशन मास्तरांनी लागलीची जिल्हापेठ पोलीस स्टेशनला फोन केला, त्यांनी आमची हद्द नसल्याचे सांगितले. यानंतर स्टेशन मास्तर यांनी पोलीस कंट्रोल रुमला फोन केला, कंट्रोम रुमकडून रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचे सांगण्यात आले. त्याठिकाणी आमची हद्द नसल्याचे उत्तर मिळाले, अशा प्रकारे मृतदेहासाठी स्टेशन मास्तरांनी कंट्रोल रुमने सुचविल्याप्रमाणे एमआयडीसी व तालुका पोलीस ठाण्यातही फोन केला मात्र हद्दीत नसल्याचे उत्तर मिळाले, अखेर 2.45 वाजता दुपारी लोहमार्ग पोलिसांनी मेमो स्विकारुन घटनास्थळ गाठले व घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेवून जिल्हा रुग्णालयात हलविला.