सोलापुर । पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचार्यांच्या आत्महत्येप्रकरणी सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात सोलापूर महापालिकेच्या सहायक आयुक्तांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल झालेले तिघेही फरार झाले. दरम्यान, सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी महापालिकेत येऊन व्हटकर व सहायक आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रांची तपासणी केली. पालिकेचे सहायक आयुक्त अभिजित हराळे, राजू बळीराम सावंत आणि सफाई अधीक्षक ए. के. आराध्ये यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय ज्ञानोबा व्हटकर असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत उषा संजय व्हटकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
शहरातील कचरा उचलण्याबाब पालिकेकडून काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला होता. हा गैरव्यवहार झाकण्यासाठी टेंडरच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यासाठी सहायक आयुक्त हराळे, राजू सावंत व सफाई अधीक्षक आराध्ये हे व्हटकर यांच्यावर दबाव आणत होते. या तणावातूनच व्हटकर यांनी तिलाटी रेल्वे स्टेशनजवळ आत्महत्या केली. व्हटकर यांनी आत्महत्येच्या कारणाची चिठ्ठी लिहली आहे. त्यामुळे याबाबत सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच सहायक आयुक्त हराळे, राजू सावंत, आराध्ये हे तिघेही गायब झाले आहेत. शुक्रवारी हे तिघेही कामावर आलेले नव्हते. सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी सकाळी महापालिकेत जाऊन तपास केला. व्हटकर यांच्या चिठ्ठीतील मजकूराच्या अनुषंगाने पोलिसांनी कचर्याच्या टेंडरसंदर्भातील कागदपत्रांची तपासणी केली. पोलिस निरीक्षक मौला सय्यद तपास करीत आहेत.