एमआयडीसीतून गुन्हा खामगाव पोलिसात वर्ग होणार
जळगाव । महिलेची बदनामी करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुध्द एमआयडीसी पोलिसात विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान हा गुन्हा खामगाव पोलिसात वर्ग करण्यात येणार आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कानळदा येथील माहेर असलेल्या मयुरी इंगळे यांचा खामगाव तालुक्यातील राहुड येथील प्रशांत इंगळे यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना तन्मय व पूर्वी अशी दोन अपत्य असून सन 2013 मध्ये प्रशांत इंगळे यांचे आजारपणामुळे निधन झाले होते. तेव्हापासून मयुरी इंगळे या सासरीच होत्या. काही दिवसापूर्वींच त्या दोन्ही मुलांसह माहेरी कानळदा येथे राहायला आल्या होत्या. तेव्हा मयुरीबाई यांनी महादेव समाधान चोपडे व रेखा पवन इंगळे यांनी संपूर्ण कॉलनीत माझी व मामा गजानन विश्वनाथ पंडीतकार यांची बदनामी केली असल्याचे भाऊ व आईला सांगितले होते. त्यानंतर 26 जुलै रोजी अचानक मयुरीबाई हया मुलगा तन्मय या घेवून गायब झाल्या होत्या. भाऊ आनंदराव दिलीपराव देशमुख यांसह कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला होता. परंतू त्या मिळून न आल्याने त्यांनी तालुका पोलिसात हरविल्याची तक्रार दिली होती. दरम्यान 4 रोजी सकाळी 7.45 वाजेच्या सुमारास मयुरीबाई यांच्यासह मामा गजानन विश्वनाथ पंडीतकार यांनी रेमंड चौफुलीपासून काही अंतरावर कारमध्ये विषारी द्रव्यप्राशन करून आत्महत्या केली होती. दरम्यान मयुरीबाई यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहीली असून त्यात त्यांनी मह्या उर्फ महादेव समाधान चोपडे व रेखा पवन इंगळे या दोघांनी माझी व मामाची बदनामी केल्याचे नमुद केले होते. दरम्यान पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली होती. या सुसाईड नोटच्या आधारावरून व मयत मयुरी इंगळे यांचा भाऊ दिलीपराव देशमुख यांने दिलेल्या फिर्यादीवरून महादेव समाधान चोपडे व रेखा पवन इंगळे या दोघांविरुध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि समाधान पाटील व पोहेकॉ भरत लिंगायत करीत आहे. दरम्यान गुन्हा खामगाव पोलिसात वर्ग करण्यात आला आहे.