नातेवाईकांचा आरोप
पिंपरी : पिंपरीतील संत तुकाराम नगर येथील टपरीचालक सचिन ढवळे यांनी सोमवारी (दि. 28) गळफास घेऊन आत्महत्या केली. सचिन याला त्रास देणार्या भाजप नगरसेविकेविरोधात तक्रार देऊनही पोलिसांनी कारवाईसाठी टाळाटाळ केली. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आपण आपल्या भावाला गमावले असल्याची भावना सचिन यांचा भाऊ शरद याने व्यक्त केली. त्यांनी पिंपरी ठाण्यातील संबधित पोलीस अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे पोस्टाद्वारे पत्र पाठवून केली आहे. भाजप नगरसेविका सुजाता पालांडे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिट्ठी लिहून सचिन याने सोमवारी आत्महत्या केली. याप्रकरणी नगरसेविका सुजाता पालांडे, सुनील पालांडे, विशाल शर्मा, अमेय बिर्जे यांच्या विरोधात पिंपरी ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेळोवेळी मारहाण होत होती
सचिन यांचा भाऊ शरद याने पोस्टाद्वारे पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, स्थानिक नगरसेविका सुजाता पालांडे, सुनील पालांडे, विशाल शर्मा, अमेय बिर्जे यांनी वेळोवेळी माझ्या भावास त्याच्या संमतीशिवाय बळजबरीने घेऊन जाऊन त्याला मारहाण केली. शारीरिक व मानसिक त्रास देऊन त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले. त्याच्याकडून वेळोवेळी पैसे काढून घेतले. त्याला पैसे देण्यास तगादा लावला. पैसे देण्याची लायकी नसल्यास आत्महत्या कर असे नगरसेविका पालांडे यांच्यासह इतर तिघे सचिनला वारंवार बोलत होते. यामुळे सचिन याची पत्नी शशिकला ढवळे यांनी 9 एप्रिल रोजी पिंपरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. परंतु या अर्जाची पोलिसांनी अद्याप पर्यंत कोणतीही दखल घेतली नाही. सुजाता पालांडे या भाजपच्या नगरसेविका असून महापालिकेत, राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे राजकीय दबावाला बळी पडून पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप पत्रात केला आहे.
आरोपींना अटक नाही
गुन्हा दाखल होऊन तीन दिवस झाले तरी आरोपींना जाणीवपूर्वक अटक केली जात नाही. सर्व आरोपी सर्रास फिरत आहेत. माझा भाऊ आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याने पोलिसांनी कारवाई केली नाही. योग्य वेळी कारवाई केली असती तर भावाचे प्राण वाचले असते. पोलिसांचे या कृतीतून आम्हाला न्यायापासून वंचित ठेवण्याचे काम राजकीय दबावाला बळी पडून होत आहे. या प्रकरणाचा पोलीस व्यवस्थित तपास करणार नाहीत अशी माझी खात्री झाली आहे. त्यामुळे कारवाईत कसूर करणार्या पोलिसांवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच माझ्या भावाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्या नगरसेविका पालांडे, सुनील पालांडे, विशाल शर्मा, अमेय बिर्जे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांच किंवा वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडून करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.