पुणे । शेतीतील नवीन तंत्रज्ञान पुणे जिल्ह्यातील शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत (आत्मा) भर देण्यात येणार आहे. त्यासाठी चार कोटी 36 लाख 93 हजार रुपयांचा आर्थिक आराखडा प्रस्तावित केला आहे. हा आराखडा राज्य समितीमार्फत केंद्र शासनाला पाठविला आहे. या आराखड्याला लवकरच मान्यता मिळणार असून, प्रस्तावित निधीतून विविध तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
निधीतून शेतकर्यांना प्रशिक्षण
यंदा प्रस्तावित केलेल्या आर्थिक निधीतून शेतकर्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय प्रात्यक्षिके, शैक्षणिक सहली, शेतकरी गट संघटन, गटाकरिता पारितोषिके, उत्कृष्ट कामे करणार्या शेतकर्यांना बक्षिसे देणे, जिल्हास्तरीय प्रदर्शने, कृषी मेळावे, माहिती प्रसार व प्रचार, शेतकरी व शास्त्रज्ञ सुसंवाद, शास्त्रज्ञ व कृषी विस्तार अधिकारी यांच्या संयुक्त भेटी, किसान गोष्टी, कृषी विज्ञान केंद्रे व इतर संस्थांच्या संशोधनाच्या माध्यमातून आलेल्या शिफारशींचा अवलंब, शेतीशाळा यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे. तसेच आकस्मिक खर्च जिल्हा व तालुकास्तरावरील प्रवासखर्च, जिल्हास्तरीय आत्मा प्रशिक्षण संस्थेस साहाय्य, शेतकरी मित्र नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे यासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. याशिवाय कार्यालयीन खर्चासाठी एक कोटी 94 लाख 20 हजार रुपये प्रस्तावित केले आहेत.
केंद्र, राज्याचा 60-40 हिस्सा
गेल्यावर्षी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेसाठी तीन कोटी 59 लाख 7 हजार रुपयांचा आर्थिक आराखडा प्रस्तावित केला होता. यंदा त्यामध्ये 77 लाख 86 हजार रुपयांची वाढ केली असून, चार कोटी 36 लाख 93 हजार रुपयांचा आर्थिक आराखडा प्रस्तावित केला आहे. मात्र गेल्यावर्षी 2018 अखेर दोन कोटी 38 लाख 26 हजार रुपये खर्च झाले होते. उर्वरित निधी चालूवर्षी खर्च करण्यात येत आहे. चालूवर्षी प्रस्तावित आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र हिस्सा 60 आणि राज्य हिस्सा 40 टक्के एवढा निधी उपलब्ध होणार आहे.