जळगाव। आदर्शनगरातील मकरापार्क परिसरातील अॅड. अशोक चौधरी हे गेल्या आठवड्याभरापासून पुणे येथे मुलाकडे गेले असल्याने घरी कुणीच नव्हते, हिच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारीत तीस ते चाळीस हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी दुपारी अॅड. चौधरी घरी आल्यानंतर उघडकीस आली. दरम्यान, दुपारी घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. मात्र, पोलिसांना चोरट्यांबाबतच कोणताच पूरावा मिळून आला नाही.
पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी
अॅड. अशोक पुंडलिक चौधरी हे आदर्शनगरातील मकरापार्क येथे कुटूंबियांसोबत राहतात. तर मुलगा निखील हा पुण्यालाच नौकरीला असून त्याचे नुकतेच दोन महिन्यापूर्वी लग्न झाले आहे. त्यामुळे अॅड. चौधरी हे पत्नी, मुलगी यांच्यासह घरातील सामान घेवून पुण्याला मुलाकडे मागील शनिवारी 8 जुलै रोजी घराला कुलूप लावून निघून गेले होते. त्यामुळे घरात कुणीच नव्हते. दरम्यान, आज शुक्रवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास अॅड. अशोक चौधरी हे कुटूंबियांसोबत घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या दरवाज्याचा कुलूप तुटलेला दिसला. घरात चोरी झाल्याचा संशय येताच त्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. यातच घरात कपाटे फोडलेली दिसले. यानंतर आतील खोलीतील कपाट देखील चोरट्यांनी फोडले दिसून आले. कपाटांची पाहणी केल्यानंतर त्यांना त्यातील तीस ते चाळीस हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच रामानंदनगर पोलिस स्टेशन गाठत घरात चोरी झाल्याची माहिती दिली. रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट घराची पाहणी केली. मात्र, याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.