आदर्शनगरातील वन परिक्षेत्र अधिकार्‍याचे घर फोडणारे तिघे जेरबंद

0

जळगाव: शहरातील आदर्श नगर परिसरातील रविंद्र नगर येथे एरंडोल येथे कार्यरत वन परीक्षेत्र अधिकारी कोमल सत्यनारायण पिंकुरवार यांचे घर फोडून चोरट्यांनी चांदीचे दागिणे व रोकड असा 10 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबविला होता. या गुन्ह्याचा अवघ्या तीन दिवसात स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला असून घरफोडी करणार्‍या तीघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. समीर हमीद काकर , मोनुसिंग जगदीशसिंग बावरी व दिपक शांताराम रेणुके तिघेही रा. तांबापुरा अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नाव आहेत.

परभणी माहेरी गेल्या वनपरीक्षेत्र अधिकारी
रविंद्र नगर यथे प्लॉट नं. 46/ ब याठिकाणी कोमल सत्यनारायण पिंकुरवार हे पतीसह वास्तव्यास आहेत. पती वर्धा येथे नोकरीला असल्याने ते वर्धा येथे येथे गेले होते.. 21 जुन रोजी सकाळी 5.30 वाजता कोमल पिंकुरवार यांच्या घरी परभणी येथून त्यांचे वडील आले. यानंतर वडीलांसोबत पिंकुरवार ह्या घराला कुलप बंद घरुन परभणी येथे गेल्या. 13 जुलै रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास पिंकुरवार यांना जळगावात त्यांच्या घराशेजारी राहणार्‍या नितीन नितीन मधुकर भामरे यांनी फोन करुन घरी चोरी झाल्याचे सांगितले होते. चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करुन मुद्देमाल लांबविला होता. दोन ते तीन दिवसांनी पिंकुरवार परभणी येथून जळगावात आल्यानंतर त्यांनी घरात पाहणी केली असता, चोरट्यांनी घरातून दहा हजार रुपये रोख व 1 भाराचे चांदीचे 500 रुपये किमतीचे जोडवे लांबविल्याचे समोर आले होते. याबाबत पिंकुरवार यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने त्यानुसार रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकाची कामगिरी
पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी घरफोडीचे गुन्हे तपासाबाबत स्थानिक गुन्हे शाखेला सुचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांनी सहाय्यक फौजदार अशोक महाजन, अशोक महाजन, हेड कान्स्टेबल राजेश मेढे, संजय हिवरकर, गफ्फार तडवी, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, किरण चौधरी यांचे पथक नियुक्त केले होते. पथकानेे तपासात गोपनीय माहितीवरून समीर हमीद काकर (तांबापुरा) याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याने चौकशीत मोनुसिंग बावरी व दिपक रेणुके या दोघा साथीदारांसोबत घरफोडी केल्याची कबूली दिली होती. त्यानुसार पथकाने मोनुसिंग व दिपक यांनाही अटक केली. पुढील कारवाई करीता तिघांना रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.