आदर्श नगरात घरफोडी ; सीसीटीव्ही फुटेजमधील महिलेसह दोन मुले ताब्यात

0

अवघ्या सहा तासाताच रामानंदनगर पोलिसांनी लावला छडा ; 1 लाख 33 हजार 600 रुपयांचा एैवज जप्त

जळगाव : आदर्श नगरात बंद घराचे कुलूप तोडून दागिणे रोख रक्कमसह एैवज लांबविल्याची घटना घडना 5 रोजी घडली होती. दरम्यान रामानंदनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणार्‍या चोरट्या मंगला प्रकाश चव्हाण (40, रा.तांबापुरा, जळगाव) या महिलेसह दोन मुलांना ताब्यात घेतले असून अवघ्या सहा तासातच गुन्ह्याचा छडा लावला आहे. महिलेच्या घरुन चोरीतील दागिणे व रोख रक्कम असा एक लाख 33 हजार 600 रुपयांचा एैवज जप्त केला आहे.

आदर्श नगरातील मुंदडा प्लॉट भागात राहणारे संजय दगडू ठोसरे (40) हे 5 जून रोजी भुसावळ येथे मावसबहिणीच्या कार्यक्रमासाठी गेले असता बंद घराचे कुलुप तोडून दागिने व 23 हजार रुपये रोख असा 1 लाख 33 हजार 600 रुपयांचा ऐवज लांबविला होता.

या पथकाने लावला गुन्ह्याचा छडा
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी अधिकार्‍यांनी गुन्हे शोध पथकाला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहायक फौजदार गोपाळ चौधरी, प्रदीप चौधरी, शरद पाटील, रवींद्र पाटील, किरण धनगर, रुपेश ठाकरे, संतोष गीते, ज्ञानेश्वर कोळी, विलास शिंदे व विजय खैरे यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ठासरे यांच्या घरातून निघताना एक मुलगी व मुलगा निदर्शनास आला. या फुटेजच्या आधारावर संशयितांचा शोध घेतला असता मंगला प्रकाश चव्हाण असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, दोन दिवसापूर्वीही नित्यानंद नगरात एक मुलगा व एका मुलीला रहिवाशांनी चोरी करताना रंगेहाथ पकडले होते.

घरझडतीत महिलेच्या घरी मिळून चोरीचा एैवज
गुन्हे शोध पथकाने मंगला हिच्या घराची झडती घेतली असता 32 हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत,16 हजार रुपये सोनसाखळी, 38 हजार 400 रुपये किमतीच्या कानातील रिंगा व टॉप्स, 19 हजार 200 रुपये किमतीच्या लहान मुलांच्या बाह्या, 3 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने व 23 हजार रुपये रोख असा 1 लाख 33 हजार 600 रुपयांचा ऐवज आढळून आला.