नवापूर:शहरातील आदर्श नगर कॉलनी परिसरात आवश्यक समस्या सोडविण्याची मागणी आदर्श नगर कॉलनी भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी, नवापूरच्या नगराध्यक्षा, विरोधी पक्षनेता, मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
न.पा.कडून होणाऱ्या कामाकडे दुर्लक्ष
शहरातील आदर्श नगर कॉलनी येथे नागरिक गेल्या दहा वर्षांपासून वास्तव्य करून राहत आहेत.अनेकदा अर्ज, निवेदन देऊन सुद्धा आदर्श नगर कॉलनीत न.पा.कडून होणाऱ्या कामास आजतागायत दुर्लक्ष केले जात आहे. कुठलेही काम काँलनीत आज अखेर झालेले नाही. आदर्शनगर येथे आवश्यक सुविधा तात्काळ सोडवण्यात याव्यात. जेणेकरून राहणाऱ्या नागरिकास अडचण निर्माण होणार नाही. गटारी साफ केल्या जात नाहीत. गटारी नेहमीच साफ करण्यात यावेत, पाईपलाईन तात्काळ करण्यात यावी, नगरपालिका नळ कनेक्शन आजअखेर झालेले नाही. सर्वांना ते देण्यात यावे, जेणेकरून भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही. उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, जेणेकरून लवकरात लवकर नळाच्या कनेक्शनची सुविधा करण्यात यावी.
रस्त्याचे डांबरीकरण नाहीच
आदर्श नगर कॉलनी येथे रस्त्याचे डांबरीकरण अद्याप झालेले नाही. पावसाळ्यात यायला जायला रस्त्यावर खूप त्रास होतो. तरी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे.
आदर्श नगर भागात दोन-तीन मोकळ्या जागा आहेत. पावसाळ्यात त्या जागेवर मोठे प्रमाणात सरपटणारे जनावरे रात्रंदिवस निघत अथवा फिरत असतात. तसेच त्या जागेवर लहान लहान मुले -मुली खेळत असतात. त्यामुळे सरपटणाऱ्या जनावरांपासून लहान मुलांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या जागेवर साफसफाई करण्यात यावी. मोकळी जागा कोणत्याही समाजास अथवा संस्थेच्या नावे रजिस्ट्रेशन करण्यात येऊ नये. अथवा मान्यता देण्यात येऊ नये. संस्थेसाठी आपण परवानगी अथवा मान्यता दिल्यास उपोषणास बसू अथवा आत्मदहनाचा इशाराही निवेदनात नमूद आहे.
आदर्श नगर कॉलनीतील नागरिकांसाठी त्या मोकळ्या जागेवर नागरिकास करमणुकी करीता अथवा उद्यान बनविण्यात यावे. रस्त्याला लागून गटारीलगत झाडेझुडपे खुरटी वनस्पती नियमित काढण्यात यावी. तसेच गटार काढल्यानंतर कचरा तात्काळ उचलून देण्यात यावा. आवश्यक सुविधा तात्काळ करण्यात यावी. कारवाई लवकर न झाल्यास धरणे आंदोलन अथवा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनावर सुधीर त्रिभुवन, दिलीप राजपूत, भास्कर मोरे, सुदाम बोरसे, भटेसिंग गिरासे, भानुदास रामोळे, राजेंद्र मोराणकर, रवींद्र पवार, ॲड.ऋतुल कुलकर्णी, सतीश मोरे, निलेश सोनार, मच्छिंद्र मिस्त्री, संदीप पाटील,सुकेंद्र वळवी, भागवत चौधरी, राजू मोराणकर आदी रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत.