भुसावळ । तालुक्यातील आदर्श गाव फुलगाव येथे गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांनी डोके वर काढल्याने या धंद्यांना कायमस्वरुपी हद्दपार करण्याच्या मागणीसाठी नशाबंदी मंडळाचे महाराष्ट्र चिटणीस चंद्रकांत चौधरी यांच्या नेतृत्वात महिलांनी ग्रामसभेपर्यंत स्वातंत्र्यदिनी मूक रॅली काढून लक्ष वेधले. रणरागिणींनी सरपंच तथा ग्रामसेवक यांना निवेदन देऊन अवैध व्यवसांयावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामरक्षक दलाच्या स्थापनेची मागणी केली आहे. व्यसनांच्या आहारी तरुण पिढी गेली आहे.
रॅली यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
रॅलीचे नेतृत्व सोनाली फुलगांवकर, दामिनी पाटील, विजया चौधरी, दर्शना पाटील, पुष्पा पाटील, मंजू चौधरी, संगीता झोपे, सुनंदा सोनवणे, नंदा सोनवणे, लता पाटील, मीराबाई चौधरी आदींनी केले. यशस्वीतेसाठी शशीकांत पाटील, मिलिंद चौधरी, नीळकंठ चौधरी, मिलिंद महाजन आदींनी परिश्रम घेतले.
आदर्श गाव अवैध धंद्यांचे केंद्र
आदर्श गाव पुरस्कारप्राप्त फुलगाव अवैध धंद्यांचे केंद्रबिंदू ठरत आहे. सट्टा-मटका, गावठी दारूसह अवैधरित्या कोळशाची या गावात जोमाने विक्री सुरू असल्याचा आरोप चंद्रकांत चौधरी यांनी केला आहे. पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांविरुद्ध तत्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.गावातील अवैध व्यवसायामुळे तरुण मुले व्यसनांच्या आहारी गेली आहेत तर त्यामुळे घरा-घरात कलह निर्माण झाले आहेत. गावाची शांतता त्यामुळे धोक्यात आली आहे.