आदर्श संकपाळचा झंझावती खेळ निर्णायक

0

मुंबई । विजय बजरंग, जय भारत, एसएसजी फाउंडेशन यांनी जयदत्त क्रीडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. प्रभादेवी, राजाराम साळवी उद्यानातील निलेश सहदेव राऊत क्रीडांगणावर झालेल्या कुमार गटाच्या सामन्यात ना म जोशी मार्गच्या विजय बजरंग व्यायाम शाळेने प्रभादेवी स्पोर्ट्सचा 48-10असा धुव्वा उडवला. आक्रमक झंजावती चढाया आणि अभेद्य बचाव यापुढे प्रभादेवीकरांची डाळ शिजली नाही. विजय बजरंगच्या आदर्श संकपाळच्या खेळाला तोड नव्हती. प्रभादेवीचा हर्षल तेरवणकर बरा खेळला. जय भारत संघाने वडाळाच्या चॅलेंजर बॉईज संघाचा 33-19 असा पाडाव केला.

जय भारत संघाचा ओमकार मोरे,तर चॅलेंजरचा अरविंद नाडा यांचा खेळ या सामन्यात उठावदार झाला. शेवटच्या सामना अत्यंत चुरशीने खेळला गेला. त्यात वडाळ्याच्या एसएसजी फाऊंडेशनने वरळीगावच्या वारसलेन संघाचा 41-32असा पराभव केला. पंकज मोहिते, ओमकार साजेकर यांच्या चढाई पकडीचा खेळ या विजयात महत्त्वाचा ठरला. सोहम नार्वेकरला अन्य खेळाडूंची साथ न लाभल्याने वारसलेन संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेचे उद्घाटन विभागीय नगरसेवक समाधान सरवणकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तारक राऊळ, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू अजिंक्य कापरे, स्पर्धा निरीक्षक चंद्रशेखर राणे, मंडळाचे अध्यक्ष प्रमोद वराडकर, सचिव किरण शेलार, स्पर्धा प्रमुख राकेश बारस्कर यांच्या उपस्थितीत पार पडला.