लंडन: आदिल रशीद या खेळाडूने काहीही ‘न करण्याचाच’ विक्रम केला आहे. लॉर्ड्सवर २ कसोटी सामन्यात इंग्लंडने उत्कृष्ट खेळी करत भारतावर विजय मिळवला. पण इंग्लंडच्या संघात असाही एक खेळाडू होता की ज्याने बॅटिंगही केली नाही, बॉलिंगही केली नाही तरीसुद्धा विक्रम केला आहे.
२ कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांचा धुवा उडवत नाकी नऊ आणले आणि भारताचा डाव १०७ धावांवर संपुष्टात आला. वेगवान गोलंदाज उत्तम कामगिरी करत असल्यामुळे इंग्लंड कर्णधार जो रूटने फिरकी गोलंदाज असणाऱ्या आदिल रशीदला गोलंदाजीची संधीच दिली नाही. इंग्लंडने फलंदाजीला उतरल्यावर पहिला डाव ७ बाद ३९६ वर घोषित केला. त्यामुळे आदिलला फलंदाजी करायला मैदानावर येताच आले नाही. त्याने क्षेत्ररक्षण केले पण कुठलाच झेलही घेतला नाही आणि कुणाला रन आऊटही केले नाही. एकंदर त्याचे योगदान शून्य होते.
हा देखील एक विक्रमच आहे लॉर्ड्स मैदानावर कसोटी सामन्यात फलंदाजी न करणे, गोलंदाजी न करणे आणि झेलही न घेणे. हा विक्रम करणारा आदिल दुसरा खेळाडू ठरला आहे. काही न करता याआधी २००५ मध्ये गॅरेथ बॅटीने हाच विक्रम केला होता.