आदिवासींचे जगण्यासाठी स्थलांतर सुरु…

0

पालघर (संतोष पाटील) :आज त्यांच्या उपजीविकेसाठी काहीच साधन उरले नाही. मार्च महिना उजाडलाय. उन्हाची रखरख सुरू झाली आहे. त्यांच्या हाताला काम नाही, तर जगायचे कसे हा प्रश्‍न सतावतोय. म्हणून आता त्यांचे घोळके शहराच्या दिशेने निघाले आहेत. पोटासाठी कामाच्या शोधात. आदिवासी पाडे ओस पडलेत. ही व्यथा आहे पालघर जिल्ह्यातील आदिवासींची. स्थानिक पातळीवर रोजगाराची उपलब्धता नसल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, कुपोषण, बालमृत्यू, पाणीटंचाई, निरक्षरता आणि इतर कारणांनी पोलघरच्या पाड्यांवरील आदिवासींचे जीवन अत्यंत बिकट झाले आहे.

अंमलबजावणी नसल्याने रोजगार हमीचा बोजवारा
स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा, स्थलांतर थांबावे, या उद्देशाने रोजगार हमी कायदा केंद्र व राज्य शासनाने केला आहे. परंतु, स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने आदिवासींना वाली उरलेला नाही. या महत्त्वाकांक्षी योजनेला बासनात गुंडाळून ठेवण्याचे काम केले जात असल्याने आदिवासीची रोजगाराअभावी होणारी पायपीट थांबलेली नाही. आजही पावसाळा संपला की येथील आदिवासी पाडे ओस पडलेेले दिसतात. भिवंडी, विरार, वसई, भाईंदर, ठाणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी ते कामाच्या शोधात जातात. कोणताही सण आला की स्थलांतरित झालेले लोक पुन्हा गावात येतात. पण सण संपला की पुन्हा रोजगारानिमित्त आपले घरदार वार्‍यावर सोडून मुलाबाळांसह शहराची वाट धरतात. आत्ताही मनरेगा या योजनेत मागेल त्याला कामही मिळत नाही आणि 15 दिवसांत दामही मिळत नाही. उलट काम नको बेकार भत्ता घ्या, अशी प्रशासनाची मानसिक अवस्था झाली असल्याने रोजगार मागणार तरी कोणाकडे? असा प्रश्‍न निर्माण झाला असून, आत्ताच्या होळीसाठी गावात आलेल्या माणसांनी आपल्या मुलाबाळांसह रोजगारानिमित्त शहरांची वाट धरायला सुरुवात केली आहे. मुंबई अहमदाबाद हायवेवर ठिकठिकाणी वाहनांची वाट बघत भरउन्हात चिमुरड्यांना घेऊन स्थलांतरित होत असलेल्या लोकांचे लोंढेच्या लोंढे आपल्याला पाहायला मिळतात. मुळात सागरी-डोंगरी अन् नागरी असे तीन भाग असलेला हा आदिवासी भाग. देशातील सर्वात मोठ्या असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून 1 ऑगस्ट 2014 पासून नव्याने पालघर हा आदिवासीबहुल राज्यातील 36 वा जिल्हा अस्तित्वात आला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नवीन जिल्ह्याच्या कामकाजास 1 ऑगस्ट 2014 पासून सुरुवात झाली. पालघर हा राज्यातील 36 वा जिल्हा आहे. कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पूर्वेकडे असणार्‍या सह्याद्री पर्वत रांगा व पश्‍चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टीदरम्यान पसरला आहे. पालघर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 30 लाखांच्या वर आहे. पालघर जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत. त्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यांचा समावेश आहे़.

स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणाचा बोजवारा
स्थलांतरावेळी आदिवासीबांधव आपल्या मुलाबाळांना सोबत घेऊन स्थलांतरित होत असल्याने मुलांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ उडतो. लहान वयातच निरक्षरता या मुलांच्या माथी मारली जाते, तर या सर्व कारणांमुळे जिल्ह्यातील जनतेला भेडसावणारे गहन प्रश्‍न लोकप्रतिनिधी आणि सरकारकडून सुटत नसल्यामुळे जनताही पुरती निराश आहे.

शासनाचा दिखावूपणा
पालघर जिल्ह्यातील आदिवासीबहुल तालुक्यातील स्थलांतर हे वर्षानुवर्ष सुरू आहे, ते थांबवण्याचे शासनाचे प्रयत्न हा फक्त दिखावूपणा आहे. याबाबतीत योग्य नियोजन आणि स्थानिक ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार, योग्य आणि वेळेत मजुरी दिली, तरच स्थलांतर थांबू शकते. स्थलांतरित गावातील लोकांची सर्व्हे नुसार आकडेवारी जाहीर करणे आवश्यक आहे.
– जगदीश धोंडी, संस्थापक, आधार प्रतिष्ठान.