आदिवासींच्या कल्याणासाठी सरकारची उत्थान योजना

0

मुरूड-जंजिरा/अलिबाग । रायगड जिह्यातील आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने आता पुढाकार घेतला असून, त्यांच्यासाठी उत्थान योजना सुरू करण्यात आल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी (प्रांत) सर्जेराव सोनवणे यांनी मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील माउंट कारमेल चर्चच्या सभागृहात केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर राज्यातील सर्वच व्हॅटिकन विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. तरीही सर्वच योजना या मूळ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. रायगड जिल्ह्यातील काही कातकरी समाजबांधव यांच्याकडे स्वतःचे घर नसल्याने त्यांना शासकीय योजनेतून घरही दिले आहे.

मुरूड तहसीलदार उमेश पाटील यांनी सांगितले की, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज ओळखूनच शासनाने त्यांच्यासाठी उत्थान योजना सुरू केली आहे. आदिवासी बांधव हे मोलमजुरीसाठी विविध ठिकाणी स्थलांतर करत असतात. त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. मात्र, त्यांना त्याची जाणीव नसते. त्यांचे स्थलांतर थांबवणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अधिकार्‍यांची उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्या राजश्री मिसाळ, मुरूड तालुका वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत जगताप, अपंग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमुलकुमार भलगट, नायब तहसीलदार दिलीप यादव, निवासी तहसीलदार आर. एस. सानप, पुरवठा विभागाच्या अव्वल कारकून सविता खोत, बोर्ली मंडलाधिकारी नारायण गोयजी, मुरूड मंडलाधिकारी रमेश म्हात्रे, सालाव तलाठी कविता बळी आदी मान्यवर उपस्थित होते.