आदिवासींच्या घरकुलांचे काम पूर्णत्वाकडे

1

यावल । गेल्या दोन वर्षांपासून जिल्हाभरातील आदिवासी बांधवांच्या रखडलेल्या घरकुलांचे काम आता सुरू झाले आहे. सन 2015- 16 मध्ये मंजूर असलेली शबरी आदिवासी योजना पारधी पॅकेज आणि या आर्थिक वर्षातील अशा एकुण 1349 घरकुलांच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यातील निधी वितरणास सुरुवात झाली आहे. प्रकल्प कार्यालयाकडे पुरसे मनुष्यबळ नसल्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ही योजना राबवत आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून अंमलबजावणी
येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्यावतीने आदिवासी बांधवांसाठी शबरी आदिवासी घरकुल योजना राबवली जाते. अनुसूचित जमातीच्या लोकांना घरकुल बांधण्यासाठी या योजनेतून पैसे दिले जातात. ही रक्कम तीन टप्प्यात घरकुल बांधकामाच्या प्रगतीनुसार मिळते. तर अनुसूचित जामातीत मोडणार्‍या पारधी समाजाला घरकुलाचा लाभ देण्यासाठी गेल्या वर्षीपासून स्वतंत्र पारधी पॅकेज घरकुल योजना सुरू झाली आहे. त्यात जिल्ह्यात 160 घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. असे असले तरी शबरी आदिवासीसह पारधी पॅकेज योजना लाभार्थी निवडीच्या तांत्रिक अडचणींमुळे रखडली होती. दरम्यान, प्रकल्प कार्यालयाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने रखडलेली ही योजना राबवण्यासाठी जिल्हा ग्रामीण यंत्रणेकडे वर्ग करण्यात आली. त्यामुळे लाभार्थ्यांना केवळ आदिवासी विभागात अर्ज करावा लागतो. पंचायत समितीमार्फत अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हा ग्रामीण यंत्रणेकडे सादर करण्यात येते. यानंतर आदिवासी विभागाकडून राज्य व्यवस्थापन कक्षाकडे निधी देवून तो जिल्हा ग्रामीण यंत्रणेद्वारे कामाच्या प्रगतीनुसार वितरित केला जातो. यानुसार आता जिल्ह्यात 1349 घरकुलांचे काम सुरू झाले आहे. लवकरात लवकर ही कामे पूर्ण व्हावीत, यादृष्टीने प्रशासनाने काम सुरू केले आहे. यामुळे संबंधित लाभार्थ्यांमध्ये समाधानाची भावना आहे.
योजनेत पारदर्शकतेसाठी घरांच्या बांधकामाची माहिती विभागास प्राप्त झाल्यावर ती थेट प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) या संकेत स्थळावर टाकावी लागते. ही माहिती लोड केल्यावर संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर निधी वितरित होतो.