नंदूरबार। आदिवासींचे हक्क हिरावले जात आहे. परिणामी आदिवासींची वाटचाल विकासाऐवजी अधोगतीकडेच सुरू आहे. शाश्वत विकास व्हावा आणि हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी एकजुटीने लढा उभारण्याची आवश्यकता असल्याचे मत सामजिक आंदोलनकर्त्यांच्या ऋणनिर्देश व सत्कार संम्मेलनावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. हा सत्कार समारंभाचे आयोजन शनिवारी नवापूर चौफली येथील देवमोगरा माता मंदिर सभागृहात करण्यात आला होता. याप्रसंगी संम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी वाहरू सानवणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र गावीत, सुहास नाईक, डॉ. राजेश वळवी, विश्राम वळवी, डॉ. नरेश पाडवी, तापाबाई माळी, रंजित गावीत, भिमसिंग पवार, वासुदेव गांगुर्डे, भारत वळवी, लतीका राजपूत, लाजरस गावीत, दिलीप गावीत आदी उपस्थित होते.
अन्याय टाळण्यासाठी साहित्याला मूर्तरूप द्या
उद्घाटकीय भाषणात पद्माकर वळवी यांनी आदिवासींच्या देवदेवतांच्या नावात बदल करून आदिवासींची मूळ ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न करणार्यांना ही बाब योग्यच वाटत असली तरी आदिवासींवर होणारा अन्याय आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी किंवा असा प्रकारची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आदिवासींची संस्कृती, मौखिक साहित्य व देवदेवतांच्या कथांना पुस्तक रूपांत मुर्तरूप दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. यानंतर जयसिंग माळी यांनी इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रस्त्यावर लढ्यासाठी सज्ज राहणे आवश्यक असल्याचे सांगितले.