आदिवासींसाठीही आता ‘टॉयलेट’ची सुविधा उपलब्ध

0

पुणे । अंगावर तोकडे कपडे, रानावनात भटकंती, आरोग्य, शिक्षण याबाबत अनभिज्ञ, डोंगराळ भागात राहणारे, मुख्य प्रवाहापासून दूर असणारे, इतकी वर्षे उघड्यावरच शौचाला जाणारे पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवही आता ’टॉयलेट’मध्ये जाणार आहेत. पुण्यातील फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड व मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने मुंबईतील खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने पालघर जिल्ह्यातील सोनाळे या आदिवासी गावात 50 अत्याधुनिक शौचालये बांधली असून, त्यावर सौर दिवेही बसविले आहेत. त्यासाठी सुमारे 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे.

50 घरांना पहिल्या टप्प्यात शौचालये
सोनाळे गावात एकूण 123 घरे असून, त्यातील 50 घरांना पहिल्या टप्प्यात शौचालये बांधून देण्यात आली आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन नुकतेच झाले. याप्रसंगी समाज कल्याण विभाग अध्यक्ष सोन्या पाटील, प्रशासकीय अधिकारी संदीप जाधव, सोनाळे गावच्या सरपंच अरुणा गुरुडे, उपसरपंच पंढरीनाथ मरड आदी उपस्थित होते.

चार टप्प्यात हा प्रकल्प राबविला जाणार
मुकुल माधव फाउंडेशनने सोनाळे गाव दत्तक घेतले असून, चार टप्प्यात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. उर्वरित 73 शौचालये दुस-या टप्प्यात ग्रामस्थांच्या संमतीनंतर बांधली जातील. तिसर्‍या टप्प्यात ग्रामपंचायतीच्या संमतीने सौर पथदिवे बसविले जाणार आहेत. तर चौथ्या टप्प्यात आरोग्याविषयी जागृती कार्यक्रम आणि आरोग्य शिबिरे घेतली जाणार आहेत. यासाठी प्रति शौचालय 24 हजार रुपये आणि सौर दिव्यासाठी 1150 रुपये असा एकूण 25 हजार 150 रुपये खर्च आला आहे. समाजाप्रती आपणही काहीतरी देणे लागतो, ही भावना रुजविण्यासाठी ग्रामस्थांकडून 2000 रुपये शौचालयासाठी आणि 50 रुपये सौर दिव्यासाठी वर्गणी घेण्यात आली आहे.

प्रत्येक घरासाठी स्वतंत्र शौचालय
या प्रकल्पाविषयी फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय व्यवस्था बोलताना रितू छाब्रिया म्हणाल्या, सोनाळे या आदिवासी गावाला स्वावलंबी आणि सक्षम बनविण्यासाठी फाउंडेशन काम करीत आहे. उघड्यावरील शौचामुळे होणारे आजार, आरोग्यावरील घातक परिणाम गावक-यांना सांगितले. प्रत्येक घरासाठी स्वतंत्र शौचालय बांधून हागणदारी मुक्त गाव करायचे आहे. मुली आणि महिलांना खासगी आणि सुरक्षित आयुष्याबाबत जागृत करण्यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील आहे. अपुर्‍या आरोग्याच्या सोयीमुळे अनेक आजार उद्भवतात. हीच बाब लक्षात घेऊन आदिवासी पाड्यांमध्ये शौचालय उभारण्याचा प्रयत्न करीत आहोत. भारतातील ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.