आदिवासींसाठी मोफत शस्त्रक्रिया, तपासणी शिबिर

0

मनोर । ठाणे-पालघर जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागांतील कोणताच रुग्ण उपचाराविना दगावला नाही पाहिजे, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ठाणे-पालघर जिल्ह्यात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवणारे निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून 4 फेब्रुवारी 2018 रोजी मौजे: कासा (डहाणू) येथे भव्य आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया व औषधे वाटप शिबिर संपन्न झाले. यावेळी वेदांता हॉस्पिटल (धुंदलवाडी) येथील डॉ. गणेश केसरी व डॉ. पलक अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरवर्ग व त्यांची सर्व टीम उपस्थित होती.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम नगराध्यक्ष विक्रमगड रवींद्रजी खुताडे, पत्रकार संतोष पाटील, उद्योजक रफिक घाची, सचिव जिजाऊ संस्था केदार चव्हाण, सचिव शिक्षण प्रसारक मंडळ श्री आप्पा भोये आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या महाआरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबिरामध्ये मु. कासा व पालघर जिल्ह्यातील सुमारे 1962 रुग्णांची नेत्र तपासणी, दंतचिकित्सा, बाल रोग, रक्तदाब तपासणी, जनरल तपासणी अशा विविध प्रकारच्या आजारांची तज्ञं डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आले व त्यांना मोफत औषध वाटप करण्यात आले त्याच बरोबर या मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून 348 रुग्णांचे मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे. यावेळी रुग्णांच्या व उपस्थित असलेल्या सर्वांच्या चेहर्‍यावर जिजाऊ संस्थेकडून राबविण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराबद्दल मानसिक समाधान जाणवत होते व अशा पद्धतीने अजून आरोग्य शिबिरे राबवले पाहिजेत, अशी आशा व्यक्त केली. जिजाऊ संस्था येत्या वर्ष भरात 150 आरोग्य शिबिरे पालघर व ठाणे जिल्ह्यात आयोजित करणार आहे.