कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अ प्रभाग क्षेत्रातील कातकरी पाड्यामध्ये नागरी मूलभूत सुविधाची वाणवा आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी या आदिवासी बांधवाना आजही पायपीट करावी लागते. प्रशासनाकडून एकीकडे मालमत्ता कर वसुलीसाठी तगादा लावला जात असताना या गरीब आदिवासीना मुलभूत सुविधा देण्यास मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. या गंभीर प्रश्नी श्रमजीवी संघटनेने पालिका आयुक्तांना निवेदन सादर केले. यावेळी आदिवासींना मुलभूत सुविधा पुरविण्याची मागणी केली आहे .
मुलभूत सुविधांचा वाणवा
कल्याणनजीक असलेल्या तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रातील मोहने कातकरी पाडा, गाळेगाव, वडवली, जेतवननगर, बल्याणी, टिटवाळा गणेशवाडी, कोळीवाडा यासारख्या परिसरात मोठ्या प्रमाणात कातकरी वसाहत आहेत. हे कातकरी मोलमजुरी सारखी हाताला मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करत आहेत. इतक्या वर्षापासून पालिकेत समाविष्ट असतानाही या नागरिकांपर्यत मुलभूत सुविधा पोचलेल्याच नाहीत.
करवसुलीसाठी तगादा
पिण्याच्या पाण्यासाठी या नागरिकांना मैलोनमैल पायपीट करावी लागत असून या भागात सार्वजनिक स्वच्छतागृह नाही, अंतर्गत रस्ते, गटारे, वीज यासारख्या सुविधा या वस्तीवर देण्यास पालिका प्रशासनाला अद्यापि मुहूर्त मिळालेला नसताना पालिकेच्या कर विभागाकडून मात्र या आदिवासीच्या झोपड्यांना शास्तीसह मालमता कर आकारला जात आहे. दररोज मोलमजुरी करून कशीबशी हाता तोंडाची मिळवणी करणार्या या नागरिकांना कराची रक्कम भरणा करणे शक्य नसतानाही पालिकेच्या अधिकार्याकडून वसुलीसाठी तगादा लावला जात असताना या गरीब आदिवासीना मुलभूत सुविधा देण्यास मात्र प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या सुविधा या पाड्यावर पुरविण्याची मागणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.