आदिवासी आश्रम शाळांची श्रेणीवाढ करणार

0

मुंबई : राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आदिवासी विद्यार्थ्याना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण देण्याच्या दृष्टीने आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आता प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यातील शासकीय सहा आश्रम शाळा आणि इंग्रजी माध्यमाच्या सात माध्यमिक शाळा मिळून एकूण तेरा शाळांमध्ये श्रेणीवाढ करीत इयत्ता आठवी ते दहावी चे वर्ग सुरू करणार असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णु सवरा यांनी दिली. गेल्या शैक्षणीक वर्षात आदिवासी विकास विभागाच्या एकुण 529 शासकीय आश्रमशाळा कार्यरत होत्या.

स्थानिकांची मागणी, विद्यार्थ्याची वाढती संख्या यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी तसेच नैसर्गीक वाढीनुसार शहापूर व जव्हार प्रकल्पाअंतर्गत जुन्नर, मुरबाड, शहापूर, जव्हार, मोखाडा आणि वाडा येथील शासकीय आश्रम शाळांमध्ये आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे तलासरी, जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तसेच पुसद, नंदुरबार, नवापूर, इगतपुरी,अकोले येथील इंग्रजी माध्यमाच्या आश्रम शाळांमध्ये श्रेणीवाढ करून इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. डहाणू, पालघर आणि तलासरी या तालुक्यांमध्ये नऊ; तर आंबेगाव, जुन्नर, मुरबाड, शहापूर, जव्हार, मोखाडा, वाडा या तालुक्यातील इंग्रजी माध्यमांच्या सात शाळा आणि वाडा व मोखाडा या तालुक्यातील दोन शासकीय आश्रमशाळांमध्ये इयत्ता आठवी व नववी वर्गाच्या अतिरिक्त तुकड्या सुरू करण्यात येणार आहेत.

शासकीय माध्यमिक आश्रम शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अधिक असल्यामुळे तेथे इयत्ता आठवी व नववी या वर्गांच्या अतिरिक्त तुकड्या मंजूर करण्यात आल्या आहेत. अतिरीक्त तुकड्यांसाठी लागणारा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गरज भागविण्यासाठी माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, कनिष्ठ लिपिक इत्यादी पदे भरण्यात येणार असल्याची माहितीही श्री.विष्णु सवरा यांनी दिली. कमी विद्यार्थी संख्या असलेले वर्ग तसेच मूलभूत सोयी सुविधा नसलेल्या शासकीय आश्रम शाळांचे जवळच्या आश्रम शाळांमध्ये लवकरच समायोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.