रावेर : तालुक्यातील कुसुंबा बु. येथील आदिवासी तरुणाला विनाकारण अमानुष मारहाण करणार्या पोलिसांवर कारवाई व्हावी यासाठी सुमारे 400 आदिवासी बांधवांनी रविवार 11 रोजी रावेर पोलीस स्थानकाच्या आवारात धरणे आंदोलन केले. या प्रकरणाची चौकशी करुन वरिष्ठांना अहवाल सादर करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक कैलास काळे यांनी आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
20 पर्यंत कारवाईचे आश्वासन
रावेर पोलीस स्थानकाचे एक पोलीस निरीक्षक त्यांच्या सहकार्यांसोबत कुसुंबा येथे गेले. तेथे विनाकारण आदिवासी युसुफ तडवी या युवकाला घरात घुसून उचलून नेले व अमानुष मारहाण केली. या निषेधार्थ संपूर्ण आदिवासी समाज सुमारे पाच तास पोलीस स्थानकाच्या आवारात धरणे आंदोलन केले. अखेर समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या सहकार्याने येत्या 20 डिसेेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन लेखी स्वरुपात मिळाल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी धरणे आंदोलनावेळी एम.बी. तडवी, हमीद तडवी, लालखा तडवी, आनंद बाविस्कर, नुरा तडवी, वसंत मिस्तरी, नसिर तडवी, बिसमिल्ला तडवी, उस्मान तडवी, सफराज तडवी यांच्यासह मोठ्या संख्येने तडवी समाज पोलीस स्थानकात दाखल होवून धरणे आंदोलनात सहभागी झाला होता. कुसुंबा बु. गावात घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात येइल. सध्या ईद व रथ पालखीसारखे सण उत्सव असल्याने घटनेची योग्य चौकशी करुन येत्या 20 पर्यंत संपूर्ण चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे लेखी आश्वासन यावेळी पोलीस निरीक्षक कैलास काळे यांनी आंदोलकांना दिले.