आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल

0

धुळे । जागतिक आदिवासी दिन म्हणून सर्वत्र साजरा होत असताना धुळे जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील बांधव धुळ्यात मोठ्या संख्येने आदिवासी दिनाच्या उत्सवात शामिल झाले होते. आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवीत वेश भूषा रंगभूषा करून,विविध पेहराव करून ढोल वाजवत शहरात दाखल झाले होते. धुळे जिल्ह्यात जागतिक अदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात आदिवासी विद्यार्थी संघटना व आदिवासी बांधवांनी धुळ्यात रॅली काढली. तसेच पारंपारिक वेशातील आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला होता. यावेळी आदिवासी बांधव हे पारंपारिक वाद्यासह ताल धरला होता. यावेळी आदिवासी महिलांनी नृत्याचा फेर धरला होता. आदिवासींचे दैवत असलेल्या बिरसा मुंडा यांचा जय जयकार करणारे फलक घेतलेल्या आदिवासी युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

पिंपळनेर येथे मिरवणुकीत पारंपारीक नृत्य
पिंपळनेर । अनु.आदिवासी आश्रमशाळा,सामोडे ता.साक्री जि.धुळे येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पार पडला. यामध्ये शाळेचे विद्यार्थी व परिसरातील समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण पिंपळनेर शहरात भव्य अशा पद्धतीत मिरवणूक काढण्यात आली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपारीक आदिवासी वेशभुषा,ढोल,पावरी ,शिबली,पावरा नृत्य अशा विविध पोषाखात लयबद्ध पद्धतीत बघणार्‍यांच्या भुवया उंचावतील अशी सुंदर नृत्ये सादर करण्यात आली. समाजातील थोर व्यक्ती ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी वाहुन घेतले अशा वीर पुरूषांच्या प्रतिमा जीवंत देखाव्यांची मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमात समाजातील तसेच पंचक्रोशीतील मान्यवर,विविध संघटनेचे पदाधिकारी,डॉक्टर आदि.उपस्थित होते. स्वागत समारोह पिंपळनेर बाजार समितीत करण्यात आला. समाजतील वारसा कसा टिकून ठेवता येईल,शिक्षणाचे महत्व,समाजाच्या विकासासाठी एकत्र यावे असे संदेश देण्यात आले. यानंतर पंचक्रोशीतील सर्व उपस्थितांकरीता सस्नेह सहभोजनाचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. .जागतिक आदिवासी दिनाच्या नागरीकांना शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यशस्वीतेसाठी पिंपळनेर व सामोडे आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपारीक नृत्यांबद्दल मान्यवरांच्या हस्ते कौतुकाची थाप लाभली.

शिंदखेडा येथे आदिवासींच्या इतिहासाविषयी मार्गदर्शन
शिंदखेडा । विश्व आदिवासी गौरव दिना निमित्त आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य, भिल समाज विकास मंच व एकलव्य भिल्ल जनसेवा मंडळ यांचा वतीने बंगला भिलाटी पासून रॅलीची सुरवात झाली रेलीचे उदघाटन कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, प.सं. माजी सभापती प्रा. सुरेश देसले , गटनेते अनिल वानखेडे यांचा करण्यात आले त्यानंतर ईश्वर पवार व जमन ठाकरे यांनी धरती मातेचे पूजन केले. परिषदचे ज्येष्ठ कार्यकर्त्या सांगल्याभाई वळवी यांनी धरतीचे गीत गायले या प्रसंगी उपनगरअध्यक्ष उल्लास देशमुख, प्रल्हाद चौधरी, दिपक अहिरे, गुलाब सोणवणे, रवी जाधव सह आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते.

हजारो आदिवासी बांधवांनी लावली हजेरी
यानंतर भव्य रेली काढण्यात आली. या रॅलीत तरुण व महिलांनी पारंपारीक वेषभूषा परिधान करून डीजेच्या तालावर नृत्य केले. आदिवासी समाजाचे थोर पुरुषांची प्रतिमा मिरवणुक काढण्यात आली. यात वीर एकलव्य, क्रांतीवीर तंट्या भिल, क्रांतीवीर पुंजा भिल, बिरसा मुंडा , राणी दुर्गावाती आदी होते. या रॅलीत 25 हजार आदीवासी बांधवानी उपस्थित लावली. रॅलीने शहर वासियांचे लक्ष्य वेधले. प्रबोधन संमेलनात शेवटी आदिवासी प्रमुख मान्यवरानी भाषणे झाली. 9 ऑगस्ट हा दिवस युनोने जागतिक आदीवासी दिवस म्हणून मान्यता दिली. हा जगभरात आदिवासी समाजात उत्साहात साजरा केला जातो आदिवासी एकता परिषदेतर्फे सन 2002 पासून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या रॅलीचा समारोप बिजासनी मंगल कार्यालयात झाला. यानंतर दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान झालेल्या संमेलनात अध्यक्ष सुका आप्पा सोनवणे हे होते. कार्यक्रमाची प्रस्तावना दिपक अहिरे यांनी केली. सुनील गायकवाड यांनी स्व लिखीत कविता गायल्या. जमन ठाकरे यांनी आदीवासी च्या इतिहासा विषयी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत सोनवणे व रोशन गावी यांनी केले.