भुसावळ । शहरातील आदिवासी टोकरे कोळी महासंघातर्फे जागतिक आदिवासी दिन क्रांतीदिन म्हणून साजरा करण्यात आला. महासंघातर्फे आदिवासी समाजातील गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांना कपडे व मिठाई वाटप करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष सपकाळे यांची उपस्थिती होती. सपकाळे यांच्या हस्ते आदिवासी देवी- देवतांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शिक्षणाच्या प्रवाहात येऊन संघटीत होण्याची गरज
आदीवासी टोकरे कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिपक सोनवणे यांनी उपस्थित समाजबांधव व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आपण या देशातील मुलनिवासी आहोत. आपल्याला आपल्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आपला आदीवासी समाज शिक्षणाच्या प्रवाहात जो पर्यंत येत नाही तो पर्यंत आपल्यावर अन्याय होतच राहिल. म्हणून प्रत्येकांनी शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. संघटीत होऊन समाजापुढील समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन सोनवणे यांनी केले. यानंतर मुलांना मिठाई व कपड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विकास सपकाळे, आरुण कोळी, विशाल कोळी, देवेंद्र कोळी, तुषार कोळी, कुंदन कोळी, विक्की कोळी, देवा सपकाळे, किरण तावडे, घनश्याम जावळे आदी उपस्थित होते.
शासकीय योजनांचा लाभ घेऊन समाजाचा विकास करा
तालुक्यातील कन्हाळे येथे आदीवासी कोळी समाजातर्फे आदीवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सरपंच सचिन सपकाळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. गावातील आदिवासी कोळी समाज बांधवांची उपस्थिती होती. सरपंच सपकाळे यांनी सांगितले की, शासनातर्फे आदिवासी समाजासाठी विविध योजना राबविल्या जातात त्यांचा लाभ घेण्यात येऊन प्रत्येकाने आपला व पर्यायाने समाजाचा विकास साधण्याचे आवाहन केले.