नंदुरबार: वर्ष उलटून देखील जिल्हा प्रशासनाने आदिवासी प्रकल्पांतर्गत येणार्या विविध समस्यांचे निवारण केले नाही, आदिवासी विकास मंत्री अॅड के.सी.पाडवी यांनीही डीबीटी प्रश्नावर घुमजाव केला. याचा निषेधार्थ भारतीय ट्रायबल पार्टीचे जिल्हाध्यक्ष के.टी.गावीत यांच्या नेतृत्वाखाली 5 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात नवापूर तालुक्यातील शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. आदिवासी पारंपरिक दुःखाचे तूर वाद्य वाजवत आणि काळ्या फिती लावून आंदोलकांनी शासनाचे लक्ष वेधले होते. नंदुरबार-तळोदा आदिवासी प्रकल्पांतर्गत येणार्या विविध २० समस्यांचे निवारण करण्यासाठी गेल्या वर्षी आदिवासी विकासमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांना निवेदन देण्यात आले होते.
डीबीटी योजना बंद करावी, या योजनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, किचन शेड मधून पुरविल्या जाणाऱ्या जेवणातून आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, योजनांना आदिवासी क्रांतीकारी महापुरुषांच्या नावे देण्यात यावीत आदी महत्त्वाच्या प्रश्न घेऊन भारतीय ट्रायबल पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले, विद्यमान आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी आमदार त्यांनी डीबीटी योजनेला विरोध केला होता, मात्र मंत्री मंत्री पदाची माळ गळ्यात पडल्यावर त्यांनी या प्रश्नावर घुमजाव केला आहे, असा आरोप जिल्हा अध्यक्ष के. टी. गावित यांनी केला आहे. या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या घरावर आदिवासी पारंपरिक तूर वाद्य वाजवीत हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात येईल असा इशारा के. टी. गावित यांनी दिला आहे.