आदिवासी भागातील पाल आऊट पोस्टला भरदिवसा कुलूप

0

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर ; वरीष्ठ अधिकार्‍यांनी दखल घ्यावी

रावेर- महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील आदिवासी भागातील एकमेव पाल) हे पोलिस दूरक्षेत्र आऊट पोष्टला असून मंगळवार, 30 रोजी भरदिवसा दुपारी 12 वाजता चक्क कुलूप लावलेले आढळल्याने ग्रामस्थांनी आश्‍चर्य व्यक्त केले. 13 गावांच्या सुरक्षिततेची जवाबदारी असलेल्या पोलिसांचे कायदा-सुव्यस्थाकडे किती गांभीर्याने लक्ष आहे ? हे यावरून दिसून येत आहे. वरीष्ठांनी याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अप्रिय घटनेनंतरही नाही घेतला पोलिसांनी बोध
मंगळवारी पालचा बाजार असतो त्यामुळे मध्यप्रदेशसह आस-पासच्या गावांचे आदिवासी बांधव बाजार करण्यासाठी पाल येथे येतात त्यामुळे बाजाराच्या दिवशीच भर दुपारीच पोलिस दुरक्षेत्राला कुलूप लावलेले असल्याने आश्‍चर्य व्यक्त झाले. आठ दिवसांपूर्वी याच आउटपोस्ट हद्दीत खून झाला होता. याच मार्गवर मोठ्या प्रमाणात गुरांची अवैध वाहतूक केली जाते तर मागे अनेकवेळा रस्तालूट सारखे गंभीर गुन्हे याच मार्गावर घडले आहेत. शेजारी मध्यप्रदेश राज्याची सीमा असल्याने चार महिन्यांपूर्वी येथे जळगाव (महाराष्ट्र) व खरगोन (मध्य प्रदेश) जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन यात कायदा-सुव्यस्था अबाधीत राखण्याचे एकमेकांना आश्वासन देण्यात आले होते परंतु या आश्वासनांना कुलूप लावून अधिकारी, कर्मचार्‍यांनी आश्‍वासनांना एक प्रकारे हरताळ फासल्याची टिका होत आहे.

पाल पोलिस हद्दीत 13 गावांचा समावेश
पाल पोलिस दूरक्षेत्र आऊट पोष्ट हद्दीत पाल, गारबर्डी, अभोडा, सहस्रलिंग, लालमाती, जीन्सी, मोरव्हाल, तिड्या, निमड्या, अंधारमळी, पिंपरकुंड, गुलाबवाडी, या आदिवासी गावांचा समावेश होता.

तपासकामी बाहेर असल्याने कल्पना नाही -अमृत पाटील
पाल आऊट पोस्टला कुलूप लावण्यात आले होते याची आपल्याला कल्पना नाही कारण आपण पाल येथील खुनातल्या गुन्ह्याच्या तपास कामी बाहेर होतो. हवालदार, पोलिस नाईक, पोलिस शिपायाची येथे नेमणूक आहे तर काही कर्मचारी बंदोबस्तानिमित्त बाहेर आहेत. झालेल्या प्रकाराची नेमकी माहिती घेवून चौकशी करतो, असे उपनिरीक्षक अमृत पाटील- यांनी सांगितले.