जळगाव । राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यातील आदिवासी भागातील मुला-मुलींच्या नेत्रतपासणीचा कार्यक्रम पुणे अंधजन मंडळ व भवरलाल अॅण्ड कांताई चॅरिटेबल फाऊंडेशन संचलित कांताई नेत्रालयामार्फत राबविण्यात आला. याअंतर्गत 40 मुला-मुलींवर तिरळेपणा दूर करणे व जन्मजात असलेला मोतिबिंदू काढण्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
चारशे विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी
जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील आश्रमशाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांतील, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी भागातील दोन ते 16 या वयोगटातील सुमारे 400 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली होती. कांताई नेत्रालयात त्यांची फेरतपासणी केल्यानंतर दि. 31 जानेवारी व 1 फेब्रुवारीस पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने मुलांवर 40 मुलांवर नेत्रशस्त्रक्रिया केल्यात. या पथकात पुण्याहून आलेले डॉ. निखिल रिषिकेशी, डॉ. अवनी देसाई, भुलतज्ज्ञ डॉ. वेलणकर, डॉ. सुधीर तरस व कांताई नेत्रालयातील डॉ. अलविन राणे, डॉ. आलोक बोरकर, डॉ. हार्दीक पटेल, डॉ. अंशु ओसवाल यांनी सहकार्य केल्याची माहिती प्रशासकीय प्रमुख अमर चौधरी यांनी दिली. या शस्त्रक्रियांमुळे मुला-मुलींना पूर्णतः दृष्टी लाभ होणार असल्याचे कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन यांनी सांगितले.