आदिवासी भागासाठी चार भरारी पथके

0

पुणे : जिल्ह्यातील आदिवासी भागात आरोग्य सुविधांचा प्रश्‍न गंभीर आहे. खेड, जुन्नर, आंबेगाव आणि मावळ तालुक्याच्या काही भागांत सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्या भागात सुविधा पुरवण्यासाठी चार नवीन भरारी पथकांची नेमणूक केली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली.

दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी लांबचा पल्ला पार करून पायी प्राथमिक उपचार केंद्र आणि उपकेंद्र गाठावे लागते. त्यामुळे दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांची मोठी पायपीट होत आहे. ही पायपीट थांबवून, त्यांना चांगले उपचार देण्यासाठी स्थानिक पातळीवर शिबिर घेऊन ही पथके काम करणार आहेत. त्यामध्ये गरोदर महिलांना तत्काळ उपचार देणे, महिलांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणेयावर भर दिला जाणार आहे. या पथकामध्ये एक वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्ग असणार आहे. त्यामुळे अतिदुर्गम भागातही नागरिकांना उपचार मिळण्याची अडचण दूर होणार आहे.

यापूर्वी अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता. गेल्या वर्षी वेल्हे तालुक्यात 65 गावांमधील 32 हजार लोकांना याचा फायदा झाला आहे. तोच धागा पकडून या भरारी पथकांच्या माध्यमातून लाभ देण्यात येईल.
भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी