आदिवासी मंत्र्याची खुर्ची हलवावी लागेल

0

हडपसर । आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात शासन कोट्यवधी रुपयांची तरतूद करते, प्रत्यक्षात आदिवासी विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नाहीत अधिकार्‍यांवर अंकुश नाही, सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी आदिवासी विकास मंत्र्यांच्या कानाजवळ फटाके फोडून खुर्ची हलवावी लागेल, विद्यार्थ्यांना समवेत घेऊन रास्ता रोको आंदोलन करणार असा इशारा माजी आमदार व शिवसेना शहरप्रमुख महादेव बाबर यांनी दिला.महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार जेवण व शालेय साहित्य मिळत नसल्याने 550 आदिवासी विद्यार्थ्यांनी मांजरी फार्म येथे आंदोलन सुरू केले आहे. वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे व जो भाजीपाला स्वस्त आहे त्या एकाच भाजीचा समाविष्ट करून जेवण दिले जात आहे. याबाबत अधिकार्‍यांनी व गृहपालांनी केवळ आश्‍वासन शिवाय काही दिले नाही अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यामुळे गृहपालाची निलंबन करण्याची मागणी आदिवासी विद्यार्थ्यांनी केली आहे.

नागपूर अधिवेशनातही दखल
नुकतेच नागपूर अधिवेशनात आदिवासी विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसल्याचा तारांकित प्रश्‍न मांडला होता. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना सेवा मिळत नसल्याने प्रश्‍न चिगळण्याचे चित्र दिसत आहे. यासंदर्भात महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेतली व प्रश्‍न समजावून घेतले. यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख समीर तुपे, संघटक अमोल हरपळे, राम खोमणे, मनसेचे उपविभागाध्यक्ष विशाल ढोरे आदी उपस्थित होते.

वसतिगृह परिसरात घाण
वसतिगृहात विद्यार्थी आंदोलन करीत असताना, परिसरात स्वछता केली जात नाही, येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, येथे दुर्गंधी सुटली आहे, यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका संभवतो. याकडे संबंधित विभागाचे लक्ष नाही, या परिसराची पाहणी महादेव बाबर व सहकार्‍यांनी केली.

विद्यार्थी सहा दिवस उपोषण करतात, काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते, अधिकारी लक्ष देत नाही, येथे संगणक, पुस्तके नाहीत, जेवण वेळेवर नाही, मागणी करून लक्ष देत नाही, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करणार, सेना आमदारांच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांसाठी मुद्दा उपस्थित केला जाईल.
– महादेव बाबर, शिवसेना शहरप्रमुख