हडपसर । मांजरी येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा संप जरी मिटला असला तरी त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्यात येत आहे. या वसतिगृहात आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मात्र काही विपरीत कारणांचा आढावा घेण्याकरीता येत्या आठवड्यात पुण्यात विशेष बैठक घेण्यात येईल. या बैठकीला शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोर्हे यांना निमंत्रित करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही ठरविण्यात येईल, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी शनिवारी दिले.
19 डिसेंबर 2017 रोजी विद्यार्थी आंदोलनाकरीता गेलेल्या पत्रकाराला मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. गोर्हे यांनी तातडीने पाठपुरावा केल्याने सहायक पोलिस आयुक्त निलेश मोरे यांचे निलंबन झाले. मात्र, येथील विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष होऊ नये या उद्देशाने पुणे शहर शिवसेनेच्या वतीने येथे आंदोलन करण्यात आले होते. याच अनुषंगाने आ. डॉ. गोर्हे यांनी शनिवारी मंत्री महोदयांची भेट घेऊन या वसतीगृहाबाबत सविस्तर चर्चा केली. येत्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात होणार्या आढावा बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती सावरा यांनी डॉ. गोर्हे यांना केली. सदर बैठकीला अप्पर आदिवासी आयुक्त चंद्रकांत डांगे, सुनिता खुडे उपस्थित होते.
वसतीगृहाचा आढावा
येथील विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. मात्र जर कोणी अवैध मार्गाने वसतीगृहांचा वापर करीत असेल तर त्याचा आढावा घेऊन योग्य ते धोरण ठरविण्याची गरज आहे. शिवसेनेच्या वतीने स्थानिक ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. वसतीगृहात बेकायदेशीरपणे राहणार्या लोकांची माहिती घेतली जाईल. यामध्ये कोणी पैसे घेऊन काम करीत आहे की काय हे पाहिले जाईल.
– डॉ. नीलम गोर्हे, आमदार
धोरणात्मक निर्णयाची गरज
बहुतांश मोठ्या शहरांत रोजगाराच्या निमित्ताने आलेल्या अनेक आदिवासी समाजातील तरुणांची ही परिस्थिती दिसून येत आहे. या विषयावर धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल.
– विष्णू सावरा, आदिवासी विकास मंत्री