आदिवासी योजनांमध्ये नऊ कोटींचा भ्रष्टाचार : तत्कालीन प्रकल्प अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा

0

सेवानिवृत्त न्या.एम.जी.गायकवाड यांच्या अहवालानंतर कारवाई ः भ्रष्टाचार्‍यांच्या गोटात खळबळ

नंदुरबार (प्रतिनिधी)- राज्यात गाजलेल्या बहुचर्चित आदिवासी योजनांच्या घोटाळ्याचे भूत अजून अधिकारी संबंधित यंत्रणेच्या मानगुटीवर थयथयाट करीत आहे. तळोदा येथील आदिवासी विकास प्रकल्पात 9 कोटी 7 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यानुसार तत्कालीन प्रकल्प अधिकारी गुलाबसिंग वळवी यांच्याविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आदिवासी योजनांमध्ये झालेल्या गैरव्यवहार बाबतच्या याचिकेवर चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयातील खंडपीठाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय कमेटी गठीत करण्यात आली होती. या समितीने चौकशी करून शासनाला अहवाल सादर केला. त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी शासकीय रकमेची अफरातफर केली आहे. अश्या व्यक्ती विरुद्ध गुन्हे दाखल करावे, असे नमूद करण्यात आले आहे.

नऊ कोटी सात लाखांचा भ्रष्टाचार
तळोदा आदिवासी विकास प्रकल्पात ऑगष्ट 2006 ते ऑगष्ट 2008 या कालावधीत तत्कालीन प्रकल्प अधिकारी गुलाबसिंग एन.वळवी यांनी व इतर संबंधितांनी अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना दुधाळ म्हशी, गाई व शेळ्यांच्या गट पुरवणे या योजनेत तसेच दूध उत्पादक कृषी सहकारी संस्था तळोदा, मंजुळबाई दूध उत्पादक संस्था, तळोदा, गोपाल दूध उत्पादक संस्था, तळोदा, महाराष्ट्र राज्य लघूउद्योग विकास महामंडळ, धुळे, महाराष्ट्र राज्य सहकरी फेडरेशन संस्था, आकाशदीप संस्था यासह अन्य संस्थाच्या नावे गाईचे युनिट एक कोटी 22 लाख चार हजार, म्हशीचे युनिट चार कोटी नऊ लाख 7हजार ,आदिवासी शेतकर्‍यांना पीव्हीसी पाईपचा पुरवठा करणे या योजनेत 19 लाख 99 हजार 690 व 2 कोटी 77 लाख 47 हजार 490 तसेच लघुउपसा सिचन योजनेत 78 हजार असा एकूण 9 कोटी 7 लाख 11 हजार 180 रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केली आहे, अशी फिर्याद तळोदा सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार तत्कालिन प्रकल्प अधिकारी गुलाबसिंग वळवी यांच्यासह इतर कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.