आदिवासी वसतिगृहात राहतात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी

0

जळगाव : शहरातील शिवकॉलनी स्टॉपवर असलेल्या जुने आदिवासी वसतिगृहामध्ये जागेअभावी चार विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या एका खोलीत पाच ते सहा विद्यार्थ्यांना रहावे लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे लोकमत प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत दिसून आले. अनेक विद्यार्थ्यांना जागे अभावी प्रवेश सुध्दा मिळालेला नाही, असे विद्यार्थी महाविद्यालयातील प्रवेश रद्द करून गावी परतल्याचे कळाले.

शिवकॉलनी स्टॉपवर राज्य शासानाचे जुने आदिवासी मुलांचे वसतिगृह आहे. या ठिकाणी धुळे, नंदुरबार तसेच रावेर, यावल जामनेर असे वेगवेगळ्या ठिकाणाहून विद्यार्थी वास्तव्यास आहेत़ वसतिगृहात १२० जणांनी क्षमता असताना फक्त ८० विद्यार्थी वास्तव्याला असून इतर विद्यार्थ्यांना शहरातील आदिवासी वसतिगृहांमध्ये राहण्यास पाठविले जाते. त्यामुळे शहरात शिक्षण घेत असताना दुर अंतराच्या वसतिगृहात वास्तव्यास पाठविल्यामुळे विद्यार्थ्यांना येणे-जाण्याचा खर्च परवडत नसल्याची बाब विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून जाणवली.

या वसतिगृहात एका खोलीमध्ये ४ विद्यार्थी वास्तव्य करू शकतात. मात्र, वसतिगृहाची जागा व खोल्यांची संख्या कमी असल्यामुळे एका खोलीत पाच ते सहा विद्यार्थ्यांना ठेवण्यात आले आहे. दरम्यान, वसतिगृहात नियमित साफसफाई होते, तसेच जेवणाची देखील सुविधा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले मात्र, शौचालय व अंघोळीच्या खोलींची दरवाजे तुटलेली दिसून आली.