यावल । शासनाच्या विविध विभागाच्या बांधकामाशी संबंधित जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर असते. स्थानिक स्वराज्य संस्था यास अपवाद आहे. यासाठी जिल्हा परिषदेकडे स्वतंत्र बांधकाम विभाग असतो. याच पार्श्वभूमीवर आता आदिवासी विकास विभागानेदेखील आपला स्वतंत्र बांधकाम विभाग स्थापन केला आहे. त्यामुळे भविष्यात एकात्मिक आदिवासी प्रकल्प विकास विभागाची बांधकामे इमारत देखभाल-दुरूस्ती या विभागामार्फत होईल.
दरवर्षी केली जातात अनेक कामे
यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प विकास विभागाचा दर वर्षीचा खर्चिक विकास आराखडा सुमारे 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त असतो. यात बांधकामाशी निगडीत अनेक विकासकामांचा समावेश असतो. त्यात आदिवासी गावातील कामे तसेच नव्याने आदिवासी वसतिगृह बांधणे, शाळा तसेच विद्यार्थ्यांचे निवासस्थान दुरूस्ती अशी अनेक कामे दरवर्षी केली जातात.
मान्यता मिळविण्याच्या कटकटींपासून मुक्तता मिळणार
अशा सर्व कामांसाठी आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आराखडा तयार करणे, तांत्रिक मान्यता घेणे नंतर प्रशाकीय मान्यता मिळवल्यावर कामासाठी आदिवासी विभागाकडून बांधकाम विभागाकडे निधी वर्ग करणे नंतर प्रत्यक्षात काम होणे यात वेळेचा अपव्यय होतो. कागदी घोडे नाचवावे लागतात. या सर्व कटकटींपासून मुक्तता मिळवण्यासाठी आदिवासी विभागाने स्वतंत्र बांधकाम विभाग कक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे दिरंगाई टळून विभागाला अपेक्षित कामांना गती मिळणे शक्य होईल.
असे असेल स्वरुप
स्वतंत्र बांधकाम कक्ष स्थापन झाल्याने आदिवासी विभागाशी निगडीत सर्व आश्रमशाळा, निवासस्थाने, वसतिगृह आदींची दरवर्षी केली जाणारी देखभाल दुरूस्ती वेळेत होईल. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागावर अवलंबून राहावे लागणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेली आदिवासी विभागाची कामे सध्या हस्तांतरित केली जात आहेत. यात जी कामे 2017 अखेर पूर्ण होऊ शकतील तीच कामे केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पूर्णत्वासाठी ठेवली जाणार आहेत. आदिवासी विभागाच्या बांधकाम कक्षाचे नाशिक उपक्षेत्रातील मुख्य कार्यालय धुळे येथे असेल. यात मुख्य कार्यकारी अभियंता- 1, कार्यकारी अभियंता-1 आणि प्रत्येक प्रकल्प कार्यालयात एक उपअभियंता काम पाहणार आहे.