यावल – उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात नव्याने उभारण्यात आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुलांच्या वसतीगृहात स्वच्छतेचा अभाव, पंडीत दिनदयाल योजनेचा वेळेवर मिळत नसलेला लाभ, डी.बी.टी.ची थकलेली रक्कम व भोजन मक्तेदार बदल केल्या निर्माण होणाऱ्या अडचणीमुळे तब्बल ९५ विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सांयकाळी यावल कार्यालय गाठत आंदोलन सुरू केले आहे.
एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल अंतर्गत जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ पाळधी ता. जळगाव मुलांचे नव्याने उभारलेले वसतीगृह आहे तेथील तब्बल ९५ विद्यार्थ्यांनी सांयकाळी सात वाजेला यावल कार्यालय गाठले व समस्यांचा पाढा वाचला त्यात नव्या वसतीगृहात कायम सफाई कामगार नसल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. नियमित स्वच्छता होत नसल्याने अनेक आरोग्यांच्या अडचणी निर्माण होत आहे तर गृहपाल देखील तेथे कायम नाहीये तसेच विद्यार्थ्यांना शासना कडून मिळणारा निर्वाह भत्ता, पंडीत दिनदयाल उपाध्याय योजनेचा रखडलेला निधी आणी डीबीटी व्दारे विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्यसह विविध गरजा भागवण्या करीता दिला जाणारा लाभ मिळत नसल्याच्या तसेच पुर्वीचा भाजन मक्तेदार हा वसतीगृह व शहरात अशा दोन ठिकाणी विद्यार्थ्यांची भोजनाची व्यवस्था करायचा मात्र, नविन मक्तेदार दिल्याने तो विद्यार्थ्यांना केवळ वसतीगृहातचं भोजन देणार आहे. तेव्हा केवळ भोजना करीता शहरातुन वसतीगृह व भोजन झाल्यावर पुन्हा शिक्षणार्थ शहरात असे हेलपाटे विद्यार्थ्यांना मारावे लागतील अशा त्यांनी तक्रारी केल्या. दरम्यान येथील प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे हे नासिक येथे बैठकसाठी गेले असल्याने विद्यार्थ्यांनी अधिकारी येईपर्यंत येथे ठिय्या मारू, असा पावित्रा घेतला आहे. तर विद्यार्थ्यांची पोलीस निरिक्षक डी. के. परदेशी यांनी समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांनी आपण शांततेत समस्या मांडणार असुन त्या अधिकारीपर्यंत पोहचवल्या खेरीज मागे हटणार नाही असे स्पष्ट केले.