नंदुरबार : राज्यात गाजलेल्या नंदुरबार येथील आदिवासी विकास विभागातील १२ कोटी ९४ लाखाच्या अपहार प्रकरणी तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापकासह वीज तंत्रज्ञ व कामगार संस्थेविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागातील एकूण ६ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाचाच हा एक भाग आहे.
तत्कालीन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या सन २००४ ते २००९ या कालावधीत आदिवासी विकास विभागामार्फत कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या होत्या. अनेक योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना न देता संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांनी संगनमत करुन अपहार केला होता. याप्रकरणी अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, येथील आदिवासी विकास विभागामार्फत सन २००४ ते २००९ या कालावधीत तेलपंप, डिझेल पंप व घरगुती गॅस वाटपाची योजना राबविण्यात आली होती. परंतू या योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना न देता त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आला होता. याबाबत आदिवासी विकास विभागातील प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संतोष संभारे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आदिवासी विकास विभागात कार्यरत असलेले तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक संभाजी राघो कोळपे रा.बोराडी ता.शिरपूर, वीज तंत्रज्ञ गोकुळ रतन बागुल रा.फुले कॉलनी, शेवगे ता.साक्री, आकाशदिप विद्युत कामगार संस्थेचे अध्यक्ष अरुण शिवलाल कोकणी, गिरीष उदेसिंग परदेशी यांच्याविरुद्ध तेलपंप, डिझेलपंप वाटपात १२ कोटी १० लाख ३ हजार २४४ रुपये तर गॅस वाटपात ८३ लाख ९७ हजार असा एकूण १२ कोटी ९४ लाख २४४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा करीत आहे.