आदीशक्ती मुक्ताईचे आज स्वस्थळी होणार आगमन

0

मुक्ताईनगर। महाराष्ट्रातील सात संतांच्या मांदीयाळीत मानाची मुक्ताई पालखी सावळ्या विठूरायाच्या भेटीसाठी वारकरी लवाजमा घेवून 30 मे रोजी मुक्ताईनगर समाधीस्थळ येथून प्रस्थान ठेवलेली पालखी 59 दिवस चौदाशे किमी प्रवास करुन शनिवार 29 रोजी भक्तीमय वातावरणात स्वस्थळी मुक्ताईनगरीत आगमन करित आहे. दोन महीन्यांपासुन गेलेली आई परतणार असल्याने मुक्ताईनगर, कोथळी, सालबर्डी गावकरी प्रचंड उत्साहीत आहेत. मुक्ताईनगरीत ठिकठिकाणी स्वागत कमानी, तोरणे, ध्वजपताका, स्वागतफलक लावल्याने भक्तीमय वातावरण झाले आहे. तसेच चौकाचौकात पुष्पवृष्टी करण्यात येईल.

दिंडी स्पर्धेसाठी 104 मंडळांनी केली नोंदणी
दिंडी स्पर्धाकरिता शंभरहून अधिक येणार्‍या भजनी दिंडीतील वारकरी भाविकांची गैरसोय होवू नयेत म्हणून बैठका घेवून नियोजन केले आहे. जुने व नवे मंदिरात महाप्रसाद भोजनाची व्यवस्था ग्रामस्थांनी केली आहे. सलग दहा वर्षापासुन होत असलेल्या स्पर्धेकरिता 104 मंडळानी नोंदणी केली असुन या व्यतिरिक्त अनेक मंडळ फक्त आगमन सोहळयात सहभागी होतात. पावणेदोन लाखांची बक्षिसे पात्र मंडळाना देण्यासाठी हभप तुकाराम पाटील बुर्‍हानपूर, हभप. नरेंद्र नारखेडे फैजपूर व हभप निवृत्ती महाराज मोरे पाचोरा हे परिक्षक नियुक्त केले आहे. सकाळी 10 वाजता नविन मंदिर येथे जिल्हा बँकेच्या संचालिका रोहीणी खडसे- खेवलकर, तहसीलदार रचना पवार, संस्थानचे मानकरी अ‍ॅड. रविंद्र पाटील, पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्याहस्ते पालखी पूजन करुन स्पर्धेचा आरंभ होईल. शहरातुन मुख्य मार्गाने मुक्ताई चौक, बस स्टँड, साई चौक, भुसावळ रोड, गजानन महाराज मंदिरमार्गे जुने मंदिर कोथळी येथे दुपारी 3 वाजेपर्यंत येईल. तेथे हभप रविंद्र महाराज हरणे पालखी सोहळाप्रमुख यांचे काल्याचे किर्तन व पायी वारकरीना संस्थानतर्फे कपडे देऊन सत्कार, तसेच परिक्षक स्पर्धा निकाल घोषित करून मान्यवरांचे हस्ते बक्षिस वितरण कार्यक्रम होईल. सोहळा यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थ मंडळी सालबर्डी कोथळी मुक्ताईनगर परिश्रम घेत आहे.