’आदेशबाबा’ ला मरेपर्यंत जन्मठेप

0

समतानगरातील बालिका अत्याचार व खूनप्रकरणात जिल्हा न्यायालयाचा निकाल ; फाशीसाठी पिडीतेचे कुटूंब उच्च न्यायालयात करणार अपील

जळगाव : समता नगरातील 9 वर्षीय बालिकेचा खून व अत्याचाराच्या खटल्यात जिल्हा न्यायालयाने संशयित आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा (वय 63) यास शनिवारी मरेपर्यंत जन्मपेठेची शिक्षा सुनावली. प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश गोविंद सानप यांनी हा निकाल दिला. संशयिताला जन्मठेप नको फाशीची शिक्षा व्हावी, म्हणून उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
या खटल्यात जिल्हा न्यायालयाने 25 मार्च रोजी संशयित आनंदा उर्फ आदेशबाबाला अपहरण, खून, अत्याचार, पोक्सो, पुरावा अशा सर्व कलमांमध्ये दोषी धरले होते. संशयित आदेशाबाबाला हजर करुन त्याला दोषी धरल्याबाबत सांगण्यात आले. 30 मार्च रोजी शिक्षेवर कामकाज झाले. सकाळी 10 वाजेपासून संशयिताला न्यायालयात आणण्यात आले. दुपारी 3 वाजता कामकाज झाले. यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोविंद सानप यांनी आदेशबाबाला वेगवेगळ्या कलमात शिक्षा तसेच दंडाची शिक्षा सुनावली आहे.

काय होते प्रकरण
12 जून 2018 रोजी ही बालिका घरातून गायब झाली होती. त्यानंतर 13 रोजी पहाटे सहा वाजता घरासमोरच टेकडीवर गोणपाटात तिचा मृतदेह आढळून आला होता. बालिका बेपत्ता झाल्यानंतर याच परिसरात राहणारा आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा (वय 63) याच्यावर संशय आल्याने त्याच्याविरुध्द रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. फरार असलेला आदेशबाबाला एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल संदीप पाटील यांनी नागझिरीच्या जंगलात पकडले होते. नागरिकांच्या मारहाणीत जखमी झाल्याने आदेशबाबा याला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर 26 जून रोजी अटक करण्यात आली होती. वैद्यकिय तपासणी व शवविच्छेदनाच्या अहवालानंतर गुन्ह्यात खून व बलात्काराचे कलम वाढविण्यात आले होते.

कलम निहाय शिक्षा व दंड
भादंवि कलम 363 अपहरण यात 4 वर्ष सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 2 महिने साधी कैद, 376 (3) 16 वर्षाच्या आतील मुलीवर बलात्कार यात मरेपर्यंत जन्मठेप व 25 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 2 महिने साधी कैद, 376 (अ) अत्याचार करुन खून करणे यात मरेपर्यंत जन्मठेप व 25 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 2 महिने साधी कैद, 302 खून करणे यात जन्मठेप, पोस्को कलम 6 यात 10 वर्ष सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 2 महिने साधी कैद, 201 पुरावा नष्ट करणे यात 5 वर्ष कारावास 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. सरकारकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अ‍ॅड. केतन ढाके यांनी काम तर आरोपीतर्फे अ‍ॅड. गोपाळ जळमकर, अ‍ॅड. विजय दर्जी तसेच मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. एस.के.कौल यांनी काम पाहिले. आदेशबाबाला सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या असून दंड भरावयाचा आहे. खटल्यात पैरवी अधिकारी रियाज शेख, राजेंद्र सैंदाणे यांनी काम पाहिले.