आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे चौक नामकरण होणार

0

पिंपरी : चिंचवड स्टेशन येथील चौकास आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव देण्यात येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाची सभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे होते. या सभेत नगरसेविका गोरखे यांनी लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव देण्याचा ठराव मांडला. तो ठराव एकमताने मान्य करण्यात आला आहे. या ठरावावर महासभेत शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

महापुरूषांच्या विचारांची प्रेरणा मिळेल
याबाबत बोलताना नगरसेविका अनुराधा गोरखे म्हणाल्या की, महापुरुषांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा नागरिकांना मिळावी या उद्देशाने शहरातील चिंचवड स्टेशन या मुख्य चौकात आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे आणि त्यांचे शिष्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे अर्ध पुतळे बसविण्यात आले आहेत. परंतु, या चौकाला चिंचवड स्टेशन चौक या नावाने ओळखले जात होते. त्यामुळे चौकाला लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव देण्याची मागणी केली जात होती. आता या चौकाला आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे चौक, असे ओळखले जाणार आहे.