आधारकार्ड नसेल तर बँक अकाउंट विसरा!

0

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने बँक खातेधारकांना त्यांच्या खात्याशी आधारकार्डला जोडण्याचे आवाहन केले आहे. तसे न केल्यास तुमचे बँक खाते बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे 30 एप्रिलआधी तुमची केवायसी डिटेल आणि आधारकार्ड नंबर बँकेत जमा करण्याची सूचना प्राप्तिकर विभागाने केली आहे. तुम्ही जर ही माहिती 30 एप्रिलच्या आधी बँकेत जमा न केल्यास विदेशी कर अनुपालन कायद्यांतर्गत तुमचे अकाऊंट बंद करण्यात येणार आहे. जर एखाद्या प्रकरणात बँक खातेधारक दिलेल्या मुदतीत बँकेत स्वतःसंदर्भातील माहिती जमा करू शकले नाहीत, त्यांचे खाते गोठवण्यात येणार आहे. ज्या खातेधारकांनी 1 जुलै 2014 ते 31 ऑगस्ट 2015 दरम्यान बँक खाती उघडली आहेत, अशा खातेधारकांनाही केवायसी देणे गरजेचे आहे. विदेशी कर अनुपालन कायद्याच्या करारावर भारत आणि अमेरिकेने स्वाक्षरी केली होती. जुलै 2015 नंतर विदेशी कर अनुपालन कायद्यांतर्गंत भारत आणि अमेरिका करासंदर्भातील माहितीची देवाणघेवाणही करू शकतात. त्यानुसार जे खातेधारक 30 एप्रिल 2017पर्यंत स्वतःसंदर्भात माहिती बँकेकडे उपलब्ध करणार नाहीत, त्यांची खाती गोठवली जाणार आहेत.

सर्व माहिती स्वप्रमाणित करावी लागणार
फॉरेन टॅक्स कॉम्प्लायन्स अ‍ॅक्ट (एफएटीसीए)च्या नियमानुसार आधारकार्ड या वित्तीय खात्यांशी लिंक करणे बंधनकारक आहे. वित्तीय खाते कायमस्वरुपी सुरू ठेवायचे असेल तर त्याचे केवायसी डिटेल्स आणि आधार नंबर बँक आणि इतर वित्तीय संस्थांना देणे बंधनकारक आहे. त्याशिवाय खातेदारांना सर्व माहिती स्व-प्रमाणित करणे बंधनकारक असल्याचेही प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे. तर खातेधारक या गोष्टी करण्यात अपयशी ठरल्यास त्यांचे खाते बंद करण्यात येऊ शकते. मात्र खाते ब्लॉक केल्यानंतर डिटेल्स दिल्यावर पुन्हा खाते सुरू होईल. गेल्या काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी आधारकार्ड सक्तीचे केले असतानाच सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या या निर्णयावर ताशेरे ओढले होते. सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी केंद्र सरकार आधारकार्ड सक्तीचे करू शकत नसल्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र बँक खाते उघडणे किंवा प्राप्तिकर भरण्यासाठी सरकार आधारकार्ड मागू शकते, असेही सुनावणीत म्हटले होते.